श्रीरामपूर शहरात नगरपालिकेने स्वतंत्र बाजारतळ उभारून आठवडे बाजार भरवा, स्थानिक रहिवाश्यांची मागणी

Published on -

श्रीरामपूर- शहरातील मोरगे वस्ती, संजीवनी हॉस्पिटल परिसरात नियमित भरणारा आठवडे बाजार आजपासून म्हाडा कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर भरणार असल्याचे नगरपालिकेने सांगितले आहे. मात्र, आठवडे बाजार म्हाडा कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर भरविल्यामुळे तेथील रहिवासी भागात अनेक अडचणी निर्माण होणार आहे.

त्यामुळे नगरपालिकेने पर्यायी जागा शोधून कायमस्वरुपी स्वतंत्र बाजारतळ उभारावा, अशी मागणी कॉलनीतील रहिवाशी नागरीकांची आहे. याबाबत नगरपालिका प्रशासनासह पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

श्रीरामपूर शहरातील नागरिकांसाठी दर शुक्रवारी आठवडे बाजार भरतो. बाजार असल्याने आठवड्याचा परिसरातील गावातून अनेक शेतकरी, व्यापारी आपला भाजीपाला विक्रीसाठी आणतात. आठवड्याचा बाजार असल्याने नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. शहरात बाजारतळ असूनदेखील अनेक वर्षांपासून हा बाजार मोरगे वस्ती, नवीन मराठी शाळा, भंगार गल्ली भागातील रस्त्यावर भरत आहे. नगरपालिका प्रशासनाने आता आजपासून बाजार म्हाडा कॉलनीतील मुख्य रस्त्यावर भरविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे म्हाडा कॉलनी परिसरातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या मोरगे वस्ती, संजीवनी हॉस्पिटल परिसर, भंगार गल्ली, नवीन मराठी शाळा या भागातील रस्त्यावरच बाजार भरत आहे. रस्त्यावरच बाजार भरत असल्यामुळे वाहतूकीची कोंडी होत होती आणि आता म्हाडा कॉलनीतील रस्त्यावरही बाजार भरल्यामुळे वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने रस्ता सोडून कायमस्वरुपी स्वतंत्र बाजारतळ उभारून बाजार भरवावा.

तसेच शहरातील इतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. याउलट शहरातील म्हाडा कॉलनीतील एकमेव मुख्य रस्ता अद्याप अतिक्रमणमुक्त आहे. त्यामुळे म्हाडा कॉलनीतील रस्त्यावर बाजार बसविल्यास या प्रशस्त रस्त्यावरही भविष्यात अतिक्रमण होणार आहे. म्हाडा कॉलनीतील मुख्य रस्त्यावर आठवडे बाजार भरवू नये.

आठवडे बाजारासाठी नगरपालिकेने स्वतंत्र पर्यायी जागा शोधून तेथे कायमस्वरुपी बाजारतळ उभारावे, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा रहिवाशांनी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत रहिवाशांच्यावतीने नगरपालिका प्रशासन व पालकमंत्री विखे यांना निवेदन देणार असल्याचे रहिवाशांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

एकीकडे श्रीरामपूर शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत आहे, तर दुसरीकडे श्रीरामपूरसाठी जिल्हा मुख्यालयाची मागणी जोर धरत आहे. अशा परिस्थितीत शहराला आठवडे बाजारसाठी स्वतंत्र व हक्काची जागा नाही ही शोकांतिका आहे. मैला मिश्रीत पाणी, अस्वच्छता हे प्रश्न समोर असताना त्याकडे डोळेझाक करून नागरी वस्तीत बाजार भरविण्याचा घातलेला घाट म्हणजे आगामी काळात साथीच्या आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. माजी आ. स्व. ज.य. टेकावडे व माजी आ. स्व. जयंत ससाणे यांनी शहराची सुटसुटीत रचना केली होती. मात्र, अशा निर्णयामुळे त्यालाही तडा जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!