महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे – काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची राज्य सरकारवर टीका

Published on -

संगमनेर ( प्रतिनिधी ) महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये देण्याची घोषणा केली. त्यांना काही दिले नाही. कर्जमाफी बाबत शेतकऱ्यांना फसवले. आमदारांच्या मारामाऱ्या सुरू आहेत.मंत्र्यांनी कसे वागावे हे सांगण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अनेक मंत्री पैशांचे घोटाळे करत आहेत. मोठा भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरून घालत आहेत. अशी राज्याची दयनीय परिस्थिती असून महायुती ही सत्तेसाठी एकत्र आली असून महायुती सरकारमुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर केली आहे.

वादग्रस्त मंत्री, त्यांची वक्तव्य सरकारचा कारभार याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, मंत्र्यांनी कसे वागावे ही सांगण्याची वेळ येते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चुकलेच आहे. अनेक मंत्री घोटाळे करत आहेत. भ्रष्टाचार करत आहेत. आमदारांचा गोळीबार, मारामारी, सत्ताधाऱ्यांची बेताल वक्तव्य सुरू असताना मुख्यमंत्री त्यांच्यावर पांघरून घालत आहेत. सुप्रीम कोर्टाने तीन हजार कोटींचा घोटाळा निदर्शनास आणून दिला. वर्क ऑर्डर रद्द करावी लागली. ते कुठेही दाखवले जात नाही.आमदारांचे भाऊ आता गोळीबार करू लागले आहेत.

पुरोगामी विचारांचे प्रवीण गायकवाड यांच्यावर हात उचलला गेला आहे. बीडमध्ये मोठी भयानक अवस्था निर्माण झाली आहे. विधानभवनामध्ये गुंड शिरतायेत, हाणामाऱ्या करत आहेत आणि भाजप त्यांना संरक्षण देते आहे हे अत्यंत वाईट आहे. लोकशाही मार्गाने आंदोलनाचा अधिकार काढून घेण्यासाठी जन सुरक्षा विधेयक या सरकारने पास करून घेतले आहे. देशामध्ये इतर राज्य पुढे जात असताना पुरोगामी महाराष्ट्राची आता अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे.

लोकशाही मध्ये सत्ताधारी आणि विरोधक एका गाडीची दोन चाकी असतात. लोकशाहीत विरोधकांचे महत्त्व मोठे आहे. परंतु अलीकडे विरोधकांना चिरडून टाकले जात आहेत. पूर्वी निधी वाटपामध्ये कधीही दुजाभाव केला जात नव्हता. परंतु आता विरोधक आमदारांना शून्य टक्के निधी दिला जात आहे. तो त्रास त्या आमदाराला नसून जनतेला होतोय. राज्यातील कॉन्ट्रॅक्टदारांचा कामांमधील एक लाख कोटींपेक्षा जास्त निधी देणे बाकी आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या अत्यंत गोरगरिबांसाठी असलेल्या योजनांसाठी पैसे नाहीत.सात महिन्यांपासून या लोकांना कोणतेही पैसे मिळत नाहीत.

शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी व लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. शेतकरी व महिलांना त्यांनी फसवले आहे. पैसे नाही तर 57 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या कशा मान्य केल्या असा सवाल विचारताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी आमदारांना निधी देणार आहे.हा दुजाभाव होत आहे. मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत.

आमदार ही अस्वस्थ आहेत. नगर विकास विभागाचा निधी मुख्यमंत्री ठरवणार आहे. मंत्रिमंडळात अविश्वासाचे वातावरण आहे. एका म्यानामध्ये तीन तलवारी राहणार कशा असा सवाल विचारताना आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबत महाविकास आघाडीची बैठक होऊन राज ठाकरे यांच्या समावेशाबाबत निर्णय होईल असेही ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!