अहिल्यानगर : राज्यासह जिल्हयात यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली, सध्या देखील अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात देखील डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी आज अनेक भागात मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या साथीच्या मात्र हंगामी आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, १४ जुलै २०२५ पर्यंत राज्यभरात मलेरियाचे ८,९८३ रुग्ण नोंदले गेले असून,ही संख्या गेल्या वर्षीच्या याचकालावधीतील ६,१५० रुग्णांपेक्षा तब्बल ४६ टक्क्यांनी अधिक आहे. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मात्र घट झाली असून, यंदा ३,१९१ रुग्ण आढळले, तर गेल्यावर्षी ही संख्या ५,७७९ होती. चिकनगुनियाचे रुग्णही वाढले असून, यंदा १,२१० रुग्ण सापडले आहेत, तर २०२४ मध्ये याच कालावधीत १,१८९ प्रकरणे नोंदवली गेली होती. मुंबई, पुणे यांसारख्या शहरी भागांतही या साथीच्या आजारांची रुग्णसंख्या वाढत असल्याचे आरोग्य यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.

चिकनगुनियाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई (१७९) आणि पुणे (१३४) येथे आढळले. आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मे महिन्यातझालेल्या पावसामुळे डासांची पैदास झपाट्याने झाली असून, त्यामुळे कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मात्र, यंत्रणांनी योग्य वेळी नियंत्रण,उपाययोजना केल्यामुळे धोका नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे.
यंदा मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळले आहेत’, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. यात मलेरियाचे जवळपास ५० टक्के रुग्ण घरीच बरे होतात, मात्र काही गंभीर रुग्ण किडनीशी संबंधित गुंतागुंत झाल्याने रुग्णालयात दाखल होत आहेत. या हंगामात प्लेटलेट्सच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले असून, रक्त क्रमणाची गरज भासत असल्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया अधिक गंभीर स्वरूप धारण करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजचे आहे.
यात प्रामुख्याने घरात व आजूबाजूला पाणी साचू देऊ नये. साचलेल्या पाण्यामुळेच डासांची उत्पत्ती होते, त्यामुळे निचरा करणे आवश्यक आहे. घरातील एखाद्या सदस्याला ताप आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टाक्या, नळ्या, प्लास्टिक कंटेनरमध्ये पाणी साठवणे टाळावे. झोपताना मच्छरदाणी, रप्रे, क्रीम यांचा वापर करावा. मलेरिया आणि चिकनगुनियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांनी सतर्कता बाळगली असून, नागरिकांनाही योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.