शेअर मार्केटच्या नावाखाली श्रीगोंदा तालुक्यातील अनेकांना आवताडेने घातला कोट्यावधींचा गंडा, ७३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल

Published on -

श्रीगोंदा- शेअर बाजारात गुंतवणूक करून जादा परताव्याच्या आमिषाने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून श्रीगोंदा तालुक्यातील अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली असल्याची चर्चा असतानाच श्रीगोंदा पोलिस ठाण्यात यातील इन्फिनाइट बिकन या प्लॅटफॉर्मच्या संचालक मंडळाच्या विरोधात ७३ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी नवनाथ जग्गनाथ अवताडे, अगस्त मिश्रा, राहुल काळोखे, गौरव सुखदिवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, ययाती मिश्रा, शुभम नवनाथ अवताडे, सुवर्णा नवनाथ अवताडे, रंगनाथ गलांडे, अनिल दरेकर, संदीप दरेकर यांच्याविरोधात नितीन अंबादास गांगर्डे (रा.मांदळी, ता. कर्जत) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी रात्री उशिरापर्यंत आहे.

याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांचा आरोपी संदीप दरेकर आणि अनिल दरेकर यांनी विश्वास संपादन करत शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांनी दिलेल्या विश्वासाने फिर्यादी यांनी इन्फिनाइट बिकन या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या वेळी सुमारे ७३ लाख ५० हजार रक्कम जमा केली.

या रकमेवर ठरल्याप्रमाणे महिना ६ ते ८ टक्के दराने परतावा मिळाला. फिर्यादी यांना ३ एप्रिलपर्यंत जमा रकमेवर १८ लाख ८० हजार ६५५ रुपयांचा परतावा मिळाला. मात्र, मे २०२५ मध्ये परतावा वेळेत न मिळाल्याने गलांडे यांना विचारणा केली असत, तांत्रिक अडचण असल्याचे सांगत परतावा जमा होणार असल्याचे सांगितले.

जून २०२५ पर्यंत परतावा न मिळाल्याने अनिल दरेकर, संदीप दरेकर, नवनाथ औताडे, यांना विचारणा केली असता, त्यांनी तांत्रिक अडचणी असल्याने व वेबसाईट अपग्रेडेशन चालू असल्याचे सांगत परतावा जमा होण्याचा विश्वास देत रक्कम जमा करण्यास टाळाटाळ केली. पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!