राहुरी- घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावेत, यासाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून देण्यात आले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सासरच्या पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत निशाद आरिफ शेख (वय २७, रा. बारगाव नांदूर, हल्ली रा. मानोरी, ता. राहुरी), यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, निशाद शेख यांचा विवाह २४ डिसेंबर २०१७ रोजी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील आरिफ वजीर शेख याच्याशी झाला होता. सासरच्या लोकांनी लग्नानंतर सुमारे दीड वर्षापर्यंत मला चांगल्याप्रकारे वागणूक दिली.

त्यानंतर घराचे बांधकाम करण्यासाठी मी माहेरहून ३ लाख रुपये आणावेत म्हणून त्रास देऊ लागले. सन २०२२ मध्ये मी माहेरहून ३ लाख रुपये आणून सासरच्या लोकांना दिले. सहा महिन्यानंतर पुन्हा घराचे राहिलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी मी माहेरहून ५ लाख रुपये आणावेत म्हणून मला मारहाण करत उपाशीपोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला.
त्यानंतर घरातून हाकलून देण्यात आले. निशाद आरिफ शेख यांनी अखेर राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी पती आरिफ वजीर शेख, सासरा वजीर आब्दुल शेख, सासू आफसाना वजीर शेख (तिघे रा. बारगाव नांदूर, ता. राहुरी) तसेच यास्मिन सोनल शेख (रा. राहुरी), आस्मा जावेद शेख (रा. देवळाली प्रवरा, बिरोबावाडी, ता. राहुरी), यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.