राहुरी : दूध डेअरी चालू करण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या घटनेबाबत सासरच्या सात लोकांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की कोमल सुदर्शन कळमकर (वय २३ वर्षे, रा.केसापूर, ता. राहुरी) या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझे लग्न ७ जून २०२३ रोजी ममदापूर येथील सुदर्शन वसंत कळमकर याचे सोबत झाले होते. लग्न झाल्यानंतर सासरच्या लोकांनी सुरुवातीचे चार महिने मला चांगले नांदविले.

त्यानंतर तू घरातील काम व्यवस्थित करत नाहीस, घराची साफसफाई करत नाही, असे म्हणून शिवीगाळ करत किरकोळ कारणावरुन मारहाण करत असे. तसेच दूध डेअरी चालू करण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी सासरच्या लोकांकडून माझा तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देवून घरातून काढून दिले.
त्या त्रासाला कंटाळून कोमल सुदर्शन कळमकर हिने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी पती- सुदर्शन वसंत कळमकर, सासरा – वसंत आनंदा कळमकर, सासू- सुनीता वसंत कळमकर, नणंद- निलोतमा अक्षय गडगे, नंदई- अक्षय आण्णासाहेब गडगे, चुलत सासरे- छगन आनंदा कळमकर, सूर्यभान आनंदा कळमकर या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.