अहिल्यानगर- पांडुरंगाने सर्वांचे संकटे दूर करून शहरात सुख, समृद्धी नांदू दे! अशी प्रार्थना आपण विठ्ठल चरणी केली आहे. मनपाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना सर्व सुविधा देण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन मनपाचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
आज अवघा महाराष्ट्र हा विठ्ठलमय झाला आहे, अनेकजण पंढरीच्या वारीला गेले आहेत. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून अनेक दिंड्या अहिल्यानगर शहरातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. या दिंड्यांचे महापालिकेच्यावतीने स्वागत करुन त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आल्या. तसेच शहरातील सामाजिक संस्था, ग्रुप, दानशुरांनी या वारकऱ्यांची सेवा केली.

आज आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध मंदिरात धार्मिक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात भाविक मोठ्या भक्तीभावाने सहभागी झाले आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त माळीवाडा येथील शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर परिसरातील श्री संत सावता महाराज विठ्ठल, रुक्मिणी मंदिरात आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते महापूजा झाली. याप्रसंगी ठेकेदार ज्ञानदेव थोरात, देवस्थाचे अध्यक्ष अँड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, विजय कोथिंबीरे, रंगनाथ फुलसौंदर, बापूसाहेब एकाडे, चंद्रकांत फुलारी, प्रा. माणिकराव विधाते, संजय चाफे, नितीन पुंड आदी उपस्थित होते.
अॅड. अभय आगरकर म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून विविध दिड्या, विविध मंदिरातील धार्मिक कार्यक्रम, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आकर्षक दिंड्यामुळे संपूर्ण शहरातील वातवरण भक्तीमय झाले होते भक्त आणि देव यांच्या भेटीचा आजचा हा आषाढी एकादशीचा सोहळा विलोभनीय असा आहे. या सर्व कार्यक्रमांस भाविकांनी गर्दी केली होती. तसेच भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. श्री विशाल गणेश सेवा मंडळाचे सदस्य परिश्रम घेत होते.
नगर शहरासह केडगाव, स्टेशन रोड, सारसनगर, दाळ मंडई, आडते बाजार बुरुडगाव रोड, सावेडी उपनगरातील, भिंगार गवळीवाडा येथील विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. उपवासाच्या पदार्थांची रेलचेल आणि बालगोपाळांची वेषभूषा, सोशल मीडियावर सकाळपासूनच आषाढीची धूम दिसून येत होती.