Shirdi News : श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी देशभरातून आलेल्या लाखो साईभक्तांनी समाधीचे दर्शन घेतले. राज्यभरातून आलेल्या पालख्यांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमली. काल अखंड श्री साईसच्चरित पारायणाची समाप्ती झाली. या मिरवणुकीत संस्थानच्या तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्के), मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व यांत्रिकी विभाग प्रमुख अतुल वाघ यांनी सहभाग घेतला.
यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात, प्र. जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, मंदिर पुजारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी ६.२० वाजता मंगलस्नान, ७.०० वाजता अंजु शेंडे व प्रेमानंद सोनटक्के यांच्याहस्ते पाद्यपूजा, ८.०० वाजता लेंडीबागेतील शताब्दी ध्वज पूजन झाले.

९.०० ते ११.३० यावेळेत श्री सुमित पोंदा यांचे साई अमृतकथा, १२.३० वाजता माध्यान्ह आरती, १.०० ते ३.०० यावेळेत श्री निरज शर्मा यांचे साईभजन, ४.०० ते ६.०० यावेळेत ह.भ.प. सौ. वेदश्री ओक यांचे कीर्तन, ७.०० वाजता धुपारती, ७.३० ते १०.०० यावेळेत अनुराधा पौडवाल यांचा साई संध्या कार्यक्रम आणि ९.१५ वाजता रथमिरवणूक झाली.
गुरुवार असल्याने चावडी पूजन झाले. चेन्नईच्या श्रीमती ललिता व कॅ. मुरलीधरन यांनी ५४ ग्रॅम वजनाचा सुवर्ण हिरेजडित ब्रोच अर्पण केला. एका भक्ताने २ किलो वजनाचा चांदीचा हार व ५९ लाख रुपये किमतीचा ५६६ ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट अर्पण केला. त्यांचे नाव गोपनीय ठेवले आहे.
११ जुलै रोजी पहाटे ६.०० वाजता मंगलस्नान, ६.५० वाजता पाद्यपूजा, ७.०० वाजता रुद्राभिषेक, १०.०० ते १२.०० प्राची व्यास यांचे काल्याचे कीर्तन व दहीहंडी, १२.१० वाजता माध्यान्ह आरती, १.०० ते ३.०० श्री रोहित दुग्गल, ४.०० ते ६.०० श्री हिमांशु जुनेजा यांचे साईभजन, ७.०० वाजता धुपारती, ७.३० ते ९.३० पद्मश्री मदनसिंह चौहान यांचा साईभजन व १०.०० वाजता होणार आहे.
श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी चेन्नई, तामीळनाडू येथील श्रीमती ललिता मुरलीधरन व कॅ. मुरलीधरन या साईभक्ताने साईचरणी ३ लाख ०५ हजार ५३२ रुपये किंमतीचा ५४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण हिरे जडीत ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला.
एका अज्ञात साईभक्ताने सुमारे २ किलो वजनाचा चांदीचा आकर्षक हार व सुमारे ५९ लाख रूपये किंमतीचा ५६६ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करत, संस्थानकडे देणगी स्वरूपात अर्पण केला. साईभक्ताच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.