राहुरी- तालुक्यातील एका गावात मुलीचा विनयभंग करत तिच्या आई वडिलांना जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे, या प्रकरणी सात आरोपींविरोधात ॲट्रोसिटी व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे करीत आहेत. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहिती अशी, की दि. ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित १७ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसह राहते.
आरोपी हे वारंवार त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करीत असल्याने याआधीही वाद झाले होते. त्या दिवशी आरोपी त्यांच्या घरालगत भितीचे बांधकाम करीत होते. यावेळी मुलीचे वडील यांनी “ही आमची जागा आहे, आमच्या जागेत बांधकाम करू नका” असे सांगितल्यावर आरोपी संतप्त झाले. त्यांनी अल्पवयीन मुलगी व तिच्या पालकांना जातीवाचक शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर आरोपींनी पीडित मुलीचा हात पकडून जबरदस्तीने जवळ ओढले व तिचा विनयभंग केला. एवढ्यावरच न थांबता मुलीच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून पळ काढला. तसेच आमच्या नादी लागाल, तर ठार मारून टाकू” अशी धमकी दिली. या घटनेनंतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींची नावे पुढीलप्रमाणेः फिरोज शेख, इब्राहीम शेख, दादाभाई शेख, करीमभाई शेख, भैय्या शेख, लालाभाई शेख, अल्ताफ शेख (सर्व रा. पिंपरी वळण, ता. राहुरी). या आरोपींवर भारतीय न्यायसंहिता कलम ११९ (१), १८९ (२), १९१ (१), १९०, ११५ (२), ३५१ (२), ३५२, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) (आर), ३ (१) (एस), ३ (१) (डब्ल्यू) (आय), ३ (२) (व्हिए) तसेच ‘पोक्सो’ अधिनियमाच्या कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे यांनी तपासाची जबाबदारी स्वतःकडे घेतली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पीडित कुटुंब भयभीत असून, त्यांना संरक्षण मिळावे, अशी मागणी होत आहे.