संगमनेर- निझर्णेश्वर देवस्थान परिसराचा विकास सर्वांगिण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहेच. मात्र, या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून या विकासासाठी भरीव मदत केली जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील निझर्णेश्वर महादेव मंदिरात काल श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले.

याच दिवशी आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते महादेवाला महादुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात, सदस्य सुमित काशीद, देवस्थान ट्रस्ट सचिव गंगाधर वायकर, पप्पू गाढे, सचिन शिंदे, बबन पवार, दिलीप जोंधळे, बाळासाहेब जोंधळे, आदित्य पवार, योगेश जोंधळे, महेश जोंधळे, भारत जोंधळे, डॉ. संदीप जोंधळे, कोकणगावचे तरुण व यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार अमोल खताळ म्हणाले की, कोकणगाव येथील निझर्णेश्वर हे जागृत देवस्थान असून, श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येत असतात. देवस्थान ट्रस्ट आणि कोकण गावमधील युवकांनी दर्शनासाठी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्व शिवभक्ताचे स्वागत करतो.
याठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आणि मंदिर परिसराच्या सर्वांगिण विकासासाठी जी काही मदत लागेल ती मदत केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आमदार अमोल खताळ यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.