कोपरगाव- कोपरगाव मतदारसंघातील सहा पाणीपुरवठा योजनांची कामे तीन वर्षांनंतरही अर्धवटच राहिल्याने आमदार आशुतोष काळे यांनी पावसाळी अधिवेशनात तीव्र शब्दांत ठेकेदारांवर निशाणा साधला. या कंपन्यांवर कारवाई करण्यात येऊन नव्या टेंडर प्रक्रियेची त्यांनी मागणी केली. त्यांच्या या मागणीने खळबळ निर्माण झाली आहे.
आ. काळे यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, जल जीवन मिशन अंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील धारणगाव, सुरेगाव, शिंगणापूर, पिंपळवाडी-नपावाडी, मळेगाव थडी, मायगाव देवी या सहा गावांसाठी पाणी पुरवठा योजनांची कामे जयंती सुपर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. मेहसाणा व सहज कन्स्ट्रक्शन इंडिया एलएलबी प्रा. लि. या दोन कंपन्यांना तीन ते साडे तीन टक्के वाढीव दराने दिली होती. या कामांना जून २०२२ ते जुलै २०२४ या कालावधीत पूर्ण करण्याची अट होती.

मात्र संबंधित कंपन्यांनी मुदतीत कामे पूर्ण केली नाहीत. परिणामी, या कंपन्यांना जून २०२५ पर्यंत मुदतवाढही देण्यात आली. तरीही आजपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी कामे अर्धवट असून निकृष्ट स्वरूपाची आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.
आ. आशुतोष काळे यांनी अधिवेशनात स्पष्टपणे सांगितले की, वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही काम पूर्ण होत नसल्यामुळे संबंधित कंपन्यांना नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करावी, काळ्या यादीत टाकावे, नव्याने टेंडर काढून नव्या ठेकेदाराला काम देऊन योजनांची अंमलबजावणी पूर्ण करावी.
शेतकरी पाण्यापासून वंचित गेल्या तीन वर्षांपासून ठेकेदारांच्या अनास्थेमुळे पाणी पुरवठा योजनांची कामे रखडली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कासवगतीमुळे शेतकरी पाण्याविना राहिले असून, मंजूर योजनेचा लाभ मिळत नाही. गावागावांमध्ये यामुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठेकेदारांना ‘वरिष्ठ आशीर्वाद’ या ठेकेदारांना वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे भासवत संथ गतीने काम सुरू आहे. कोणतीही कारवाई होणार नाही, असा त्यांना आत्मविश्वास आहे. त्यामुळेच आ. आशुतोष काळे यांनी या कंपन्यांची कामे रद्द करून नव्याने टेंडर प्रक्रिया राबवावी आणि त्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी ठाम मागणी केली आहे.