संगमनेर- शहरातील भूमिगत गटारीच्या कामादरम्यान झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेसाठी नगरपालिकेच्या अनधिकृत कृतीला जबाबदार ठरवत, आमदार सत्यजित तांबे यांनी मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. यासोबतच, या दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या नगरपालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी विधान परिषदेत आक्रमकपणे मांडली.
संगमनेर शहरात भूमिगत गटारीच्या कामाला 2021 मध्ये मंजुरी मिळाली होती, परंतु सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या (एसटीपी) जागेच्या वादामुळे हे काम अपूर्ण राहिले. तरीही, नगरपालिकेने अनधिकृतपणे गटार जोडण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. या कामादरम्यान ठेकेदाराचा कर्मचारी अतुल पवार याचा विषारी वायूमुळे मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्यासाठी गेलेला रियाज पठाण हा दुसरा कामगारही मृत्यूमुखी पडला. आमदार तांबे यांनी सभागृहात सांगितले की, जर नगरपालिकेने अपूर्ण कामात गटार जोडले नसते, तर कचरा अडकण्याचा प्रश्न उद्भवला नसता आणि ही दुर्घटना टळली असती.

आमदार तांबे यांनी नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका केली. त्यांनी नमूद केले की, अपूर्ण कामात गटार जोडण्याची कोणतीही गरज नव्हती, आणि या चुकीमुळे दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणी ठेकेदारावर कारवाई झाली असली, तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. तांबे यांनी अशा निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या अतुल पवार आणि रियाज पठाण यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी आमदार तांबे यांनी प्रत्येकी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, ही रक्कम नगरपालिकेने द्यावी, आणि जर नगरपालिकेला हे शक्य नसेल, तर राज्य सरकारने मुख्यमंत्री निधीतून ही तरतूद करावी असंही ते म्हणाले.