संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात 100 बेड चे अत्याधुनिक रुग्णालयाचे काम सुरू असून घुलेवाडी व साकुर येथील आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधा मिळाव्या या मागणीसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत मागणी केली असून दोन्ही ठिकाणी आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळण्यासाठी शासन कटिबद्ध राहील असे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार सत्यजित तांबे यांनी घुलेवाडी व साकुर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कामांबाबत प्रश्न विचारला. यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले की माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रांना दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे. याचबरोबर संगमनेर तालुक्याची मोठी संख्या असून संगमनेर शहराची ही वाढती लोकसंख्या आहे. म्हणून घुलेवाडी येथे अत्याधुनिक 100 बेडचे रुग्णालय व्हावे याकरता त्यांनी 13 ऑगस्ट 2022 रोजी मंजुरी मिळवली. निधी मिळून हे काम सुद्धा सुरू आहे. मात्र नागरिकांच्या वाढत्या अडचणींबद्दल डॉक्टर कर्मचारी औषध आणि उपचारांची मोठी कमतरता याबाबत आमदार सत्यजित तांबे यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांना प्रश्न विचारले याचबरोबर साकुर येथील ग्रामीण रुग्णालयातही अत्याधुनिक सुविधा मिळाव्या अशी मागणी केली.

तर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मंत्री ना.प्रकाश आबिटकर म्हणाले की, संगमनेर शहर व तालुक्याकरता माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. घुलेवाडी येथे शंभर बेडचे अद्यावत रुग्णालय श्रेणीवर्जित करण्यात आले आहे. या ठिकाणी डॉक्टर कर्मचारी औषधे यांची कसलीही अडचण येणार नाही तसेच साकुर येथे सध्या 15 बेडची असलेले रुग्णालयासाठी नव्याने 30 बेडची मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आवश्यक अधिकारी कर्मचारी औषधे सर्व पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येईल असे ते म्हणाले.
यामुळे घुलेवाडी आणि साकुर मधील आरोग्य केंद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधांसह नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार आहेत. या कामी महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सातत्याने पाठपुरावा राहिला असून नव्याने निधीतून यामध्ये आधुनिक सुविधा व्हाव्यात याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी पाठपुरावा करून वाढीव सुविधा मंजूर करून घेतले आहेत.
संगमनेर शहरात स्वतंत्र महिला हॉस्पिटल होणार
संगमनेर शहर हे मोठे असून कॉटेज हॉस्पिटल या ठिकाणी स्वतंत्र महिला हॉस्पिटल व्हावे याकरता सौ.दुर्गाताई तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या महिलांच्या स्वतंत्र रुग्णालयाकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य पातळीवर मोठा पाठपुरावा केला असून या कामी मंजुरी आणि निधी सुद्धा मंजूर करून ठेवला होता आता नव्याने या सर्व कामांना आरोग्य विभागाने सकारात्मक मंजुरी दिली आहे. यामुळे ग्रामीण व शहर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.