भिंगार शहर हे नगर जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध आणि लष्करी दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठिकाण असून, सध्या हे शहर गंभीर वाहतूक समस्यांनी ग्रस्त आहे. सततच्या वाहतूक कोंडीत व्यापारी, सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांपासून रुग्णांपर्यंत सर्वांचेच जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी सामाजिक जाणिवेतून पुढाकार घेत, केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.
राष्ट्रीय महामार्गातून शहराला त्रास
भिंगार शहराच्या मध्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ जात असल्यामुळे, या महामार्गावर दररोज तीव्र वाहतूक दबाव जाणवतो. विशेषतः भिंगार नाला ते विजय लाईन चौक आणि भिंगार अर्बन बँकपासून महात्मा फुले पतसंस्थेपर्यंतचा मार्ग सतत अडथळ्यांनी भरलेला असतो. हे मार्ग व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत सक्रिय असून, स्थानिक व्यापाऱ्यांना व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

स्थानिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम
दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा, हॉर्नचा गोंगाट, आणि अपघातांची शक्यता यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य दोन्ही धोक्यात आले आहे. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित वावरही कठीण झाला आहे. या पार्श्वभूमीवर उड्डाणपूल हा एकमेव ठोस पर्याय असल्याचे लंके यांनी अधोरेखित केले.
ऐतिहासिक महत्त्व
भिंगार हे शहर केवळ ऐतिहासिकदृष्ट्याच नव्हे, तर प्रशासकीयदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. येथे लष्करी छावणी, विविध शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, बँका व रूग्णालये असल्यामुळे दिवसेंदिवस नागरिकांची व वाहनांची वर्दळ वाढत आहे. ही वाढती गर्दी शहराच्या क्षमतेपलीकडे गेल्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे सध्याचे चित्र गंभीर झाले आहे.
खासदार लंके यांची ठोस पावले
या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन खासदार नीलेश लंके यांनी नितीन गडकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. त्यांनी दिलेल्या निवेदनात उड्डाणपूल उभारणीसाठी आवश्यक बाबी अधोरेखित केल्या असून, या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.