अहिल्यानगर- रिझर्व्ह बँक व केंद्रीय निबंधक विभागाच्या परवानगीनुसार नगर अर्बन को ऑप. मल्टीस्टेट बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. ५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी असलेल्या खातेदार, ठेवीदारांना ५० टक्के रक्कम परत मिळण्यास सुरुवात झाली आहे.
आतापर्यंत संगमनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, शेवगाव, बेलापूर येथील खातेदारांना पैसे परत मिळाले आहेत. अजूनही सुमारे ५५० ठेवीदार, खातेदारांचे अर्ज केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने प्रतीक्षेत आहेत. त्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन बँकेचे जागृत सभासद राजेंद्र चोपडा व बँक बचाव कृती समितीने केले आहे.

राजेंद्र चोपडा यांनी म्हटले की, बँकेचे अवसायक गणेश गायकवाड व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष प्रयत्न व बँक बचाव समितीचा पाठपुराव्यामुळे पाच लाखांहून अधिक रक्कम असलेल्या ठेवीदारांना खातेदारांना निम्मी रक्कम मिळण्यास सुरुवात झाली आहे. ठेवीदार, खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे परत मिळत आहेत. व्यापक सार्वजनिक हित लक्षात घेऊन आम्ही सातत्याने या प्रश्नी आवाज उठवून पाठपुरावा करीत आहोत.
त्याचे चांगले परिणाम पहायला मिळत आहेत. सर्वसामान्यांना त्यांच्या कष्टाची रक्कम परत मिळणे हा त्यांचा हक्क आहे. तो मिळवून देण्यासाठी सातत्याने पत्र व्यवहार, पाठपुरावा करीत आहोत. बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांच्यासह अधिकारी काळे, औटी, योगेश कुलकर्णी, अंतुले भंडारी, प्रितम लोढा यांच्यासह कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत.