अहिल्यानगर- नागपूर येथील मेकअप आर्टिस्टला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिला गर्भवती राहिल्याने आरोपीने लग्न करण्यास नकार दिला आणि तिला लाथाबुक्कक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. पीडितेच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा झाला आहे.
संतोष देवराव गादे (वय ४२, रा. शहर टाकळी, शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेने फिर्यादीत म्हटले की, २०२३ मध्ये औरंगाबादेतील एका सलूनमध्ये आमची ओळख झाली. तो वारंवार तिथे येत होता, ज्यामुळे आमचे प्रेमसंबंध जुळले. संतोषने लग्नाचे आश्वासन देऊन शारीरिक संबंध केले. पण, नंतर लग्नास नकार दिला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

त्या गुन्ह्यात तो तुरुंगात गेला. २७सप्टेंबर २०२४ रोजी तो कारागृहातून बाहेर आल्यानंतर संतोष गादे याने थेट नागपूर गाठले. पीडितेची माफी मागितली. मला पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा आहे. असे सांगून पीडितेला पुन्हा लग्नाचे आमिष दाखवले. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी पीडितेला अहिल्यानगरच्या निर्मल नगर, तपोवन रोड येथे किरायाच्या खोलीत ठेवले. तिथे तो दोन ते तीन दिवसांतून एकदा यायचा. त्याकाळात पुन्हा शारीरिक संबंध ठेवले.
त्यामुळे पीडिता गरोदर राहिली. पीडिते त्याला गरोदर असल्याचे सांगितल्यानंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्याने तिला छत्रपती संभाजीनगरमधील केस मागे घेण्यास सांगितले. तिने नकार दिल्यावर त्याने तिला रोज मारहाण, शिवीगाळ आणि पोटातील बाळाला मारण्याची धमकी दिली. गरोदर असतानाही त्याने जून २०२५ पर्यंत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपी संतोष याने पीडितेला नागपूरच्या छत्रपती स्क्वेअर येथे एकटी सोडली आणि तिची व पोटातील बाळाची कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.