अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक व लष्करी वारसा लाभलेले भिंगार शहर सध्या अत्यंत गंभीर आणि दिर्घकालीन वाहतूक समस्येच्या विळख्यात अडकले आहे. या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक जाणीवेने काम करणारे खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांची भेट घेऊन भिंगार येथे उड्डाणपूल बांधण्याची आग्रही मागणी केली.
यासंदर्भात खा. लंके यांनी मंत्री गडकरी यांना निवेदनही सादर केले असून त्यात नमूद करण्यात आले आहे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ हा अत्यंत महत्वाचा महामार्ग भिंगार शहराच्या मध्यातून जातो. विशेषतः भिंगार नाला ते विजय लाईन चौक व भिंगार अर्बन बँक ते महात्मा फुले पतसंस्था या मार्गावर सततची वाहतूक कोंडी अनुभवायला मिळते.
दैनंदिन वाहतूक समस्येमुळे शालेय वेळेत विद्यार्थ्यांना वेळेवर पोहचण्यास अडचणी निर्माण होतात. रूग्णवाहिका वाहतूकीच्या कोंडीत अडकून त्यांना वेळेवर रूग्णालयात पोहचता येत नाही. स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायातील अडचणींबरोबरच वाहन चालक व पादचाऱ्यांमध्ये दररोजच तणावपूर्ण वातावरण असल्याचेही खा. लंके यांनी निदर्शनास आणून दिले.
भिंगार शहर हे अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचा एक महत्चाचा भाग असून त्याला ऐतिहासिक, लष्करी आणि नगरी वारसा लाभलेला आहे. येथे आजही मोठया प्रमाणावर छावणी क्षेत्र, शासकीय कार्यालये, बँका, शाळा, रूग्णालये आणि व्यापारी प्रतिष्ठाने कार्यरत आहेत. तर दुसरीकडे शहराच्या रस्त्यांचा आराखडा मात्र आजही जुनाच आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला आणि वाहनांच्या संख्येला तो झेपेनासा झाला आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरीकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
प्राथमिक सर्वेक्षणाचे निर्देश द्या
भिंगार शहरासाठी उड्डाणपूलाची आवष्यकता लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे निर्देश द्यावेत, वाहतूक सुरळीत करून अपघात टाळण्यासाठी यंत्रणा उभारण्यात यावी, व्यापारी आणि नागरिकांचे पुनर्वसन नियोजनबध्द पध्दतीने करावे अशी मागणी खा. लंके यांनी केली.
स्थानिक नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
भिंगारमधील नागरिक, व्यापारी, रिक्षाचालक, शाळा व्यवस्थापन समित्या आणि सामाजिक संस्थांनी खासदार लंके यांनी केलेल्या या मागणीचे स्वागत केले आहे. वर्षानुवर्षे ही समस्या भेडसावत असून अखेर एक जबाबदार आवाज दिल्लीत पोहचतोय, ही बाब आमच्यासाठी दिलासा देणारी असल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या.