श्रीगोंदा- तालुक्यातील लिंपणगाव – रेल्वे स्टेशन रस्त्याचे दोन महिन्यापूर्वी काम पूर्ण झाले. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता पहिल्याच पावसात खराब होऊन खड्ड्यांमुळे या रस्ताची चाळण झाली आहे.
निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोट्यवधी रुपये पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्याच्या ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

मुंढेकरवाडी, लिंपणगाव – रेल्वे स्टेशन हा चार किलोमीटर रस्ता दोन कोटी रुपये खर्चुन दोन महिन्यापूर्वी पूर्ण करण्यात आला. मात्र पहिल्याच पावसात हा रस्ता ठिकठिकाणी उखडल्याने खड्डे पडले आहेत.
पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचून जागोजागी डबकी साचली जात आहे. खड्ड्यांमुळे या रस्त्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकी स्वाराच्या अपघाताला आमंत्रण मिळत आहे. रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी परिसरातील नागरिकांना हा जवळचा रस्ता आहे.
मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोट्यवधी रुपयांचा पहिल्याच चुराडा झाला असून निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
दोन महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाच्या झाल्यामुळे हा रस्ता पहिल्याच पावसात खराब होऊन रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याने जाताना रस्त्यावरील खड्डे हुकविताना कसरत करावी लागत आहे. तर काही ठिकाणी हा रस्ता दबला गेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून हा रस्ता उकरून रस्त्याचे काम पुन्हा टेंडर नुसार करावे अन्यथा परिसरातील नागरिकांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल.
– लक्ष्मण खळदकर प्रवासी / नागरिक
हा रस्ता जास्तीत जास्त १० टन वजनाची वाहतूक करणाऱ्या वाहनासाठी असून या रस्त्यावरून ४० टन वजनाची अवजड वाहने जात असल्याने रस्ता खराब झाला आहे. सदर रस्त्याचे काम दुरुस्त करण्यासाठी ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत.