नेवासा- तालुक्यातील रस्तापुर येथील उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव नेवासा येथील तहसीलदार संजय बिरादार यांच्या उपस्थितीत नुकताच सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रस्तापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अण्णासाहेब झुंबर अंबाडे होते. हे उपसरपंचपद रोटेशन पद्धतीने ठरले होते. परंतु त्यांची मुदत संपूनही ते पदाचा राजीनामा देत नव्हते व मनमानी पद्धतीने कारभार करीत होते. कोणालाच विश्वासात न घेता कामकाज पहात होते, असा आरोप यावेळी उपस्थित सदस्यांनी केला.

यावेळी तहसीलदार बिराजदार यांना उपस्थित असलेले सदस्यांनी आपण हात वर करून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणार असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे उपसरपंच अंबाडे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाच्या बाजूने हात वर करून आपले मत नोंदवले.
त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य शशिकला भाकड, मनीषा गाढवे, संदीप उकिर्डे, सीमा भाकड, बेबीताई कुटे, सुनिता डाके, बापूसाहेब अंबाडे, अमोल वैरागर, मिरा मचे, भाऊसाहेब माळी, या १० सदस्यांनी व लोकनियुक्त सरपंच हिराबाई कोकाटे यांच्यासह ११ सदस्यांनी हातवर करून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. अविश्वास ठराव मतदान प्रक्रियेसाठी नेवासा येथील तहसीलदार संजय बिराजदार, सहाय्यक महसूल अधिकारी शिरीष कुलकर्णी, रस्तापूर येथील ग्राम महसूल अधिकारी सी. ए. गडकर, रस्तापूर ग्रामपंचायत अधिकारी ए. एल. शिंदे यांनी त्यांना सहाय्य केले.
या प्रक्रियेवेळी काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शनिशिंगणापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बालाजी मुसळे, पोलीस शिपाई हेमंत झिने, पोलीस शिपाई आर. बी. गर्जे यांनी बंदोबस्त ठेवला होता. ही अविश्वासाची ठराव प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालय रस्तापूर, या ठिकाणी सुरळीत पार पडली.