Ahilyanagar News : मे महिन्यात झालेला जोरदार पाऊस आणि हवामान खात्याच्या अंदाजाच्या भरोशावर कोपरगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकांच्या पेरण्या केल्या आहे. परंतु जून महिन्यात पावसाने अपेक्षाभंग केल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून गोदावरी कालव्यांना तातडीने ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जून महिन्यापासून सुरु होणाऱ्या पावसाचे यंदा मे महिन्यातच आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होऊन पुढील पावसाच्या भरोशावर कोपरगाव मतदार संघात सोयाबीन, बाजरी, मका, कापूस, भुईमुग आदी खरीप पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे.

परंतु जून महिना संपून जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी कोपरगाव मतदारसंघात खरीप पिकांसाठी आवश्यक असलेले पर्जन्यमान झालेले नाही व त्यामुळे भूजल पातळी देखील वाढलेली नाही.
पुढील काळात जर पावसाने अशीच उघडीप दिली. तर खरीप पिकांना व बारमाही पिकांना त्याचा फटका बसून शेतकऱ्यांचे नुकसान होवू शकते व पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण होवू शकतो. एकीकडे कोपरगाव मतदारसंघात जरी पावसाने उघडीप दिली असली,
तरी मे व जून महिन्यात धरण क्षेत्रात मात्र, समाधानकारक पाऊस झालेला असून अधून-मधून आषाढ सरी सुरु आहे. त्यामुळे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीमध्ये जवळपास १० ते १२ हजार क्युसेक विसर्ग सुरु असून जायकवाडी धरणामध्ये जिवंत पाणीसाठा ४६ टक्के इतका झाला आहे.
तर दुसरीकडे मात्र गोदावरी कालवे बंद आहे. गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडल्यास भूजल पातळी वाढण्यास मदत होवून शेतकऱ्यांच्या विहिरींना पाणी उपलब्ध होईल व अडचणीच्या काळात हेच पाणी खरीप पिकांना देवून शेतकऱ्यांना आपले खरीप पीक वाचविता येईल.
त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून तातडीने गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे, अशी मागणी आ. काळे यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे केली आहे.