राहाता- महसूल विभाग हा थेट सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असल्याने महसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलतेने, तसेच सकारात्मक संवादाच्या माध्यमातून काम करावे. यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण होईल, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहाता येथे महसूल विभागातर्फे आयोजित ‘महसूल सप्ताह – २०२५’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री आणि अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, तहसीलदार अमोल मोरे, राहाता नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव लोंढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, भाजपाचे अध्यक्ष रविंद्र गोंदकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, महसूलमंत्री असताना महसूल पंधरवड्याची संकल्पना प्रथम राबवण्यात आली. खंडकऱ्यांच्या जमिनीचे प्रश्न सुटले. शेती महामंडळाच्या जमिनी विविध शासकीय उपक्रमांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. गायरान जमिनींचा उपयोग घरकुलांसाठी करण्यात आला.
तसेच, भोगवटा २ मधील नोंदी भोगवटा १ मध्ये समाविष्ट करण्यात आल्या. महसूल सेवा अधिक सुलभ व पारदर्शक करण्यासाठी त्या ऑनलाईन स्वरूपात नागरिकांना उपलब्ध करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
अपर जिल्हाधिकारी कोळेकर यांनी अनेक सेवा आता एका क्लिकवर ऑनलाईन उपलब्ध असून त्यामध्ये आणखी सेवेचा समावेश केला जात असल्याचे सांगितले. कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जात प्रमाणपत्र, सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे लाभ, जीवंत सातबारा मोहीम, शर्तभंग जमीन नियमाकुल करणे, स्वामित्व योजनेंतर्गत सनद, एग्रीस्टॅक योजनेतील शेतकऱ्यांना ओळखपत्र आणि भोगवटा २ चे भोगवटा १ मध्ये रूपांतर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
तसेच अस्तगाव, चोळकेवाडी, पडसवाळ या तीन किलोमीटरच्या शिवरस्त्याच्या मोजणी नकाशांचे वाटप करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी या नव्याने घोषित महसूली गावाच्या अधिसूचनेचे वाटपही ग्रामस्थांना करण्यात आले.