सोनई : शिंगणापूर येथे बनावट ॲप संदर्भात अहिल्यानगर सायबर शाखेने शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर काल सोमवारी (दि. १४) सकाळीच तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी शिंगणापूर येथे घटनास्थळाची पाहणी करून चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे.
आमदार विठ्ठलराव लंघे व आमदार सुरेश धस यांनी शिंगणापूर येथे देवस्थानचे नाव वापरून कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा विधानसभेत लक्षवेधी प्रश्न मांडला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲप घोटाळ्यावर कारवाईचा इशारा दिला. शनिशिंगणापूर येथे शनिदेवाची पूजा अभिषेक व तेल अर्पण संदर्भात खोटा मजकूर ऑनलाईन पसरवला व भाविकांची व देवस्थानची फसवणूक केल्याप्रकरणी पाच ॲपधारक व साथीदारावर अहिल्यानगर सायबर शाखेने शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

बनावट ॲपधारक व त्यांचे साथीदारांनी ऑनलाईन दर्शन पूजा, अभिषेक, तेल चढावा बुकिंग करीता शनैश्वर देवस्थान व धर्मदाय आयुक्त यांची कोणतीही परवानगी घेतली नसून भाविकांकडून ऑनलाईन पद्धतीने अनियमित दराने स्वतःच्या फायद्यासाठी रक्कमा स्वीकारल्या होत्या. त्यामुळे अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवारी (दि. १४) सकाळीच सायबर शाखेचे तपासी अधिकारी पेंदाम यांनी शिंगणापूर येथे येऊन ॲप संदर्भातील माहिती, सीसीटीव्ही फुटेज पाहणी करून अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची माहिती घेतली असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
शनैश्वर संबंधित ऑनलाईन दर्शन देवस्थानाशी व सेवा पुरवणाऱ्या ॲप घोटाळ्याचा गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे. या गुन्ह्यात स्थानिकांचा सहभाग असल्याचा सायबर पोलिसांना संशय आहे. स्थानिक मदतीशिवाय अशा प्रकारची मोठी आर्थिक फसवणूक करणे शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे अज्ञात ॲप मालकांसह कोणत्याही स्थानिक व्यक्तींचा, अधिकाऱ्यांचा किंवा देवस्थान ट्रस्टमधील सदस्यांचा न्यात सहभाग होता का, त्यांचा संपर्क झाला आहे का, याचा तपास सुरू आहे.
– सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक