अकोले- तालुक्यातील कोतुळ परिसरात नाचणठाव रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने रविवारी दुपारी साडेतीन वाजता छापा टाकून एकूण १ कोटी १ लाख ७४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ५७ लाख २ हजार ४०० रुपयांचा अवैध गुटखा आणि ४४ लाख ७२ हजार ३५० रुपयांचा इतर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून, यामध्ये ७५ हजार ३५० रुपयांची रोख रक्कम देखील समाविष्ट आहे.
या कारवाईचे नेतृत्व परीक्षाविधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी केले. त्यांच्या पथकात उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस कर्मचारी शंकर चौधरी, दिगंबर कारखीले, अजय साठे, दिनेश मोरे, आरविंद भिंगारदिवे, उमेश खेडकर, सुनिल पवार, सुनील दिघे, अमोल कांबळे, मल्लिकार्जुन बनकर, जाधव आणि दहिफळे यांचा समावेश होता.

पोलिसांनी या कारवाईत हिरा पान मसाला ११० पोते आणि रॉयल ७१७ सुगंधी तंबाखू ५० पोते असा एकूण ५७ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. यासोबत सात लहान मोठी वाहने, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा ४४ लाख ७२ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कोतुळ परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली असून, हे ठिकाण गुटखा साठवणुकीसाठी वापरण्यात येत होते.
या प्रकरणी १२ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी अकोले तालुका आणि कोतुळ परिसरातील रहिवासी असून, गुटख्याच्या साठ्याशी त्यांचा थेट संबंध असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची ही यशस्वी मोहीम स्थानिक गुन्हेगारीविरोधात निर्णायक ठरली आहे. स्थानिक पातळीवरील गुटखाविक्री आणि साठ्याच्या अवैध साखळीवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.