अहिल्यानगर- राज्यात रक्षाबंधनाच्या दिवशी सकल हिंदू समाजाच्या वतीने विशेष सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असून, राज्यातील विविध जिल्ह्यांसह अहिल्यानगर शहरात हिंदू समाजातील महिला आमदार, खासदार, नगरसेवक, स्थानिक पदाधिकाऱ्यांना राखी बांधून महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा तात्काळ लागू करण्याची मागणी करणार आहेत. राखी केवळ नात्याची नाही, तर हिंदू भगिनींच्या सन्मानाची आहेर अशा भावनिक पद्धतीने महिलांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली या उपक्रमात शेकडो महिला आपला सहभाग नोंदवणार आहेत. अनेक ठिकाणी मंदिर परिसर, वसाहती, गावपंचायती व लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. लव्ह जिहादच्या घटनांमध्ये महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढ होत असून, अनेक युवती प्रेमाच्या नावाखाली फसवून, नंतर जबरदस्तीने धर्मांतर केल्या जात आहेत. यात अनेक वेळा मानसिक छळ, मारहाण, आणि आत्महत्येपर्यंतच्या घटना घडत आहेत.

त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा गरजेचा असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड व गुजरातसारख्या राज्यांमध्ये आधीच लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मात्र याबाबत अद्याप कोणताही विशेष कायदा अस्तित्वात नसल्याने अशा गुन्ह्यांवर कारवाई करताना पोलिसांनाही अडचणी येतात. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने हा कायदा संमत करून अमलात आणावा, अशी मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या रक्षणासाठी राखी बांधते. पण यंदा या राखीतून बहिणी स्वतःच्या आणि इतर भगिनींच्या सन्मानासाठी रक्षण मागणार असून लव्ह जिहादविरोधात कायदेशीर संरक्षण हवे आहे. हेच यंदाच्या राखी पौर्णिमेच्या जनजागृतीचे केंद्रबिंदू ठरले आहे. या उपक्रमात किशोरी, गृहिणी, विद्यार्थिनी, महिला कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवणार असून काही ठिकाणी महिला भाषण व फलकांद्वारे समाजात जागरूती करणार आहेत