गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत ३ दिवस श्री साईबाबांचा भव्य उत्सव, असे असणार आहेत कार्यक्रम, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक?

Published on -

शिर्डी- संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ९ ते ११ जुलै २०२५ या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या भव्य उत्सवामध्ये सर्व साईभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले आहे.

पत्रकात म्हटले, की गुरु-शिष्य परंपरा ही अत्यंत प्राचीन असून आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. श्री साईबाबांच्या जीवनकालातही ही गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरी केली जात असे. त्यामुळे या दिवसाला आजही अनन्यसाधारण महत्त्व आहे. साईबाबांवर श्रद्धा असणारे असंख्य भाविक दरवर्षी शिर्डीत येऊन समाधीचे दर्शन घेतात आणि या उत्सवात सहभाग घेतात.

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त बुधवार, ९ जुलै रोजी पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी श्रींची काकड आरती होईल. त्यानंतर ५ वाजून ४५ मिनिटांनी श्रींच्या फोटो आणि पोथीची मिरवणूक काढण्यात येईल. सकाळी ६ वाजता द्वारकामाई येथे श्री साईसच्चरिताच्या अखंड पारायणास प्रारंभ होईल. ६ वाजून २० मिनिटांनी श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ७ वाजता पाद्यपूजा होईल. दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी माध्यान्ह आरती, १.३० ते ३.३० दरम्यान निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम, सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कीर्तनाचा कार्यक्रम होईल.

सायंकाळी ७ वाजता धुपारती होईल. रात्री ९ वाजून १५ मिनिटांनी श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक निघेल. मिरवणुकीनंतर रात्री १० वाजता शेजारती होईल. याप्रसंगी द्वारकामाई मंदिर रात्रभर पारायाणासाठी उघडे राहील. गुरुवारी, १० जुलै रोजी गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशीही कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

पहाटे ५.१५ वाजता काकड आरती, ५.४५ वाजता अखंड पारायणाची समाप्ती व मिरवणूक, ६.२० वाजता मंगलस्नान व दर्शन, सकाळी ७वाजता पाद्यपूजा होईल. सकाळी १० ते १२ या वेळेत कलाकारांचे कार्यक्रम, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती, सायंकाळी ४ ते ६ दरम्यान कीर्तन होईल. संध्याकाळी ७ वाजता धुपारती व रात्री ९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येईल. या दिवशी समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. त्यामुळे श्रींची शेजारती व ११ जुलै रोजीची काकड आरती होणार नाही.

रात्री १० ते पहाटे ६ या वेळेत मंदिराजवळील स्टेजवर इच्छुक कलाकारांचे साईभजन कार्यक्रम होणार आहेत. गुरुवारीच्या उत्सवाचा समारोप शुक्रवार, ११ जुलै रोजी होईल. पहाटे ६ वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, ६.५० वाजता पाद्यपूजा, सकाळी ७ वाजता गुरस्थान मंदिरात रुद्राभिषेक होईल. सकाळी १० ते १२ या वेळेत गोपाळकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी १२.१० वाजता माध्यान्ह आरती आणि सायंकाळी ७ वाजता धुपारती होईल. रात्री १० वाजता शेजारती होऊन उत्सवाची सांगता होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!