अहिल्यानगर : पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विशेष पथक स्थापन करून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाया सुरू केल्या. त्यामुळे अवैध धंद्यावाल्यांचे कंबरडे मोडण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र कोणतेही विशेष पथक कायमस्वरूपी नसते. त्यामुळे विशेष पथक आता बरखास्त करण्यात येणार आहे.अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
तसेच सायबर पोलीस ठाण्यामध्ये कर्मचारी कमी आहेत. नव्याने सायबर पोलीस ठाण्यामध्ये कर्मचारी देण्यात येणार आहेत. मात्र ज्या कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान आहे अशांना सायबरमध्ये संधी दिली जाणार असल्याचे देखील पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले. त्याचसोबत आता एलसीबीमध्ये कर्मचाऱ्यांना थेट नियुक्त्या देण्यात येणार आहेत. मात्र, जुन्या कर्मचाऱ्यांना एलसीबी संधी दिली जाणार नाही. जुन्या-नव्यांची पात्रता पाहून एलसीबीत कर्मचाऱ्यांना संधी दिली जाईल, असे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.

एलसीबीमध्ये नियुक्ती मिळावी यासाठी अनेक लोकप्रतिनिधींकडून सुद्धा कर्मचाऱ्यांनी शिफारस पत्र आणले आहे. मात्र, त्या शिफारस पत्राचा यथायोग्य विचार करून त्या कर्मचाऱ्याची सर्वांगीण मुलाखत घेऊनच एलसीबीत नियुक्ती देण्यात येईल. कर्मचाऱ्यांला त्याच्या क्षमतेनुसार काम दिले जाईल.असेही ते म्हणाले.