अहिल्यानगर- जिल्ह्याच्या सीमावर्ती आणि अतिदुर्गम भागात वसलेल्या घाटघर गावात यंदाचे भातशेतीचे काम विलंबाने आणि अनेक अडथळ्यांनंतर पूर्णत्वास गेले आहे. पावसाच्या वेळकाळाशी न जुळवता आलेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांना भात लावणीसाठी यावर्षी फार मोठे आव्हान पत्करावे लागले. आता, आवणीचे काम संपल्यानंतर ते आपल्या उदरनिर्वाहासाठी रोजंदारीच्या शोधात गावाबाहेर पडत आहेत.
अवकाळी पावसामुळे वापसा नाही
दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घाटघरमधील शेतकरी धूळवाफ्यात भात रोपे टाकण्याचे काम सुरू करतात. मात्र यावर्षी मेमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे, अपेक्षित “वापसा” मिळाला नाही. परिणामी, रोपे टाकण्यास उशीर झाला. जूनमध्ये पाऊस उसंत देताच काही प्रमाणात रोपे टाकण्यात आली, पण त्याचे उगम जुलै महिन्यातच झाले.

पावसामुळे रोपे सडली, पुन्हा करावी लागली पेरणी
जेथे वेळेवर रोपे टाकली गेली होती, तिथे अवकाळी पावसामुळे रोपे सडली, पिवळसर पडली. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करत नव्याने रोपं तयार केली. परिणामी संपूर्ण प्रक्रिया उशीराने झाली. त्यातही रोपे अपेक्षेइतकी सशक्त तयार झाली नाहीत. जेवढी रोपे तयार झाली, ती गाळ तुडवत भातखाचरांमध्ये लावण्यात आली. काही ठिकाणी वेळेअभावी शेतकऱ्यांनी ‘इर्जुक’ पद्धतीचा वापर केला.
पावसाच्या चक्रामुळे लागवडीत बदल
या भागात भात वाणांमध्ये यंदा १००८, १२५, अक्षीत, एलपी आणि इंद्रायणी या जातींची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा अनुभव सांगतो की, या वाणांना वेळेवर खतांचा पुरवठा न झाल्यास उत्पादनात मोठी घट होऊ शकते. त्यामुळे खत पुरवठा वेळेत व भरवशाचा असणे गरजेचे आहे. विशेषतः १००८ वाण ही लवकर परिपक्व होणारी जात असल्याने, तिच्याकडे अधिक झुकाव दिसून आला आहे.
आवणी पूर्ण, पण रोजगाराचा प्रश्न कायम
घाटघर शिवारातील सर्व भात आवण्या सध्या पूर्ण झाल्या असून, आता बहुसंख्य आदिवासी शेतकरी मजुरीसाठी अकोले तालुक्यातील इतर भागांत स्थलांतरित होत आहेत. शेतीतील साग्रसंगीत मेहनतीनंतर आता त्यांचा मुख्य आधार मजुरीचाच आहे. पावसाच्या ओढगस्तीने पीक चांगले येईल याची शाश्वती नाही, त्यामुळे हाताला काम मिळवण्यासाठी ते गावाबाहेर पडले आहेत.
विरळ लागवड केल्याने उत्पादनावर परिणाम
पावसाचा फटका एवढा जबरदस्त होता की अनेक शेतकऱ्यांना रोपे पुरेसे उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे काहींना शेतांमध्ये विरळ लागवड करावी लागली. घाटघरचे शेतकरी प्रकाश खडके सांगतात, “२५ मे रोजी रोहिणी नक्षत्र सुरू झाल्यानंतरच रोपे टाकायचे ठरवले होते. पण पावसामुळे ओल जमेना. त्यामुळे शेवटपर्यंत रोपांची कमतरता जाणवत राहिली.”