आईबापानं पोत अन् गंठण शिवून पोराला शिकवलं, पोरानं सीए होत आईबापाच्या कष्टाचं पांग फेडलं, संगमनेरच्या विशालची प्रेरणादायी यशोगाथा

Published on -

संगमनेर- शहरातील गंठण काम करणाऱ्या पांडुरंग आणि सुवर्णा मिठ्ठा यांचा मुलगा विशाल याने सीए फायनलची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. आर्थिकदृष्ट्या अत्यंत बेताच्या परिस्थितीत वाढलेल्या विशालने आपल्या कठोर परिश्रम आणि आई-वडिलांच्या त्यागातून मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘आई-वडिलांनी कर्ज काढून माझे शिक्षण पूर्ण केले,’ असे सांगताना विशालच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर मुलाच्या यशाने पांडुरंग आणि सुवर्णा यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसले. या यशामुळे संगमनेरात विशालचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मिठ्ठा कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहे. काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात पांडुरंग मिठ्ठा यांनी संगमनेरात स्थलांतर केले. पांडुरंग आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा, ज्या दिव्यांग आहेत, शहरातील सराफी पेढीसमोर बसून गंठण काम करतात. या कामातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. तरीही, त्यांनी आपल्या मुलगा विशाल आणि मुलगी हेमा यांच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. आर्थिक अडचणींना तोंड देत त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज आणि व्याजाने पैसे घेतले, पण त्यांच्या स्वप्नांना कधीच मर्यादित होऊ दिले नाही.

विशालचे प्राथमिक शिक्षण संगमनेरातील बालशिक्षण मंडळाच्या पद्मरसिक शाह विद्यामंदिरात, तर माध्यमिक शिक्षण श्री दिगंबर गणेश सराफ विद्यालयात झाले. त्यानंतर त्याने ओहरा कनिष्ठ महाविद्यालय आणि शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयातून पुढील शिक्षण पूर्ण केले. विशालला सुरुवातीला सीए म्हणजे काय, याची फारशी माहिती नव्हती. मात्र, अकरावीला असताना डॉ. पराग सराफ यांनी अकाउंट्स विषयाच्या क्लासमध्ये त्याला मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळे विशालने सीए होण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी अथक परिश्रम घेतले.

मिठ्ठा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. पांडुरंग आणि सुवर्णा यांनी गंठण कामातून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नातून कुटुंबाचा खर्च भागवताना मुलांच्या शिक्षणासाठी बचत गट आणि खासगी सावकारांकडून कर्ज घेतले. सुवर्णा यांच्या दिव्यांगत्वामुळे त्यांना अनेक मर्यादा होत्या, तरीही त्यांनी कधीही हार मानली नाही. विशाल आणि त्याच्या बहिणीनेही आई-वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. विशालने सांगितले की, त्याच्या यशात शिक्षकांचेही मोलाचे योगदान आहे, ज्यांनी त्याला प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन दिले.

विशालच्या सीए फायनलमधील यशाने मिठ्ठा कुटुंबाला आनंदासह अभिमानाची भावना दिली आहे. पांडुरंग मिठ्ठा म्हणाले, “अतिशय प्रतिकूल परिस्थितीत माझ्या मुलाने हे यश मिळवले. मुला-मुलीच्या शिक्षणासाठी आम्ही घेतलेल्या कष्टाचे चीज त्यांनी केले आहे. परिस्थिती बदलते, मात्र त्यासाठी मेहनत घ्यावी लागते.” विशालच्या यशाने केवळ त्याच्या कुटुंबालाच नव्हे, तर संगमनेरातील अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. आर्थिक अडचणींना न जुमानता कठोर परिश्रम आणि चिकाटीने मोठी स्वप्ने साकारता येतात, याचे विशाल मिठ्ठा हे जिवंत उदाहरण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!