तळेगाव दिघे- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे नाशिक ते श्री क्षेत्र भगवानगड सुरु असलेली एकमेव एसटी बस वगळता नगर ते नाशिक अन्य बसेस फेऱ्या होत नसल्याने प्रवाशी, विद्यार्थी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तळेगाव दिघे मार्गे त्वरित बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब कारभारी दिघे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
या संदर्भात दिघे यांनी म्हटले आहे की, पूर्वी रस्त्याची अत्यंत दुर्दशा असताना तळेगाव दिघे मार्गे नेवासा ते नाशिक, श्रीरामपूर ते नाशिक श्रीगोंदा ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या बसेस अनेक वर्ष सुरू होत्या. त्यामुळे देवस्थानच्या ठिकाणी दर्शनासाठी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्या-येण्याची प्रवासी व ग्रामस्थांची सोय होत होती. मात्र, काही वर्षांपूर्वी रस्ता दुर्दशेमुळे सदर बसेस फेऱ्या बंद झाल्या.

त्यानंतर नाशिक ते श्रीक्षेत्र भगवानगड ही एकमेव बस तळेगाव दिघे मार्गे सुरू करण्यात आली. सद्यस्थितीत नाशिक व नगर येथे जिल्ह्याच्या ठिकाणी अनेकांना सकाळी शासकीय कामानिमित्ताने जावे लागते आणि त्यानंतर पुन्हा सायंकाळच्या सुमारास परतीचा प्रवास करावा लागतो.
मात्र, बसेसची सोय नसल्याने प्रवाशी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तळेगाव दिघे मार्गेचा दुपदरी डांबरी रस्ता सध्या सुस्थितीत आहे.
एकीकडे विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एकीकडे शासन मोफत पास सुविधा उपलब्ध करून देत असताना तळेगाव दिघे मार्गेच्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर बसेस फेऱ्या सुरु नसल्याने मुलींनी शिक्षणासाठी प्रवास कसा करावा, असा प्रश्न आहे. त्यामुळे नगर आणि नाशिक तसेच नेवासा व श्रीरामपूर एसटी आगारांनी तळेगाव दिघेमार्गे बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे यांनी केली आहे.