पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीला ७६ लाख रुपयांचा नफा, चेअरमन सुभाषराव बर्डे यांची माहिती

Published on -

पाथर्डी- सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीला ७६ लाख रुपये नफा झाला असून, आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे सर्व संचालक यांच्या सहकार्याने तोट्यातील संस्था नफ्यात आणण्याचे काम केले असल्याचे चेअरमन सुभाषराव बर्डे यांनी म्हटले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना बर्डे यांनी सांगितले की, तिसगाव उपबाजार समिती आवारात नवीन ५० क्विंटल वाजन काटा बसवला त्याचबरोबर या ठिकाणी शेतकरी व्यापाऱ्यांसाठी गाळ्यांची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, तसेच स्वच्छता आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे या सर्व आवश्यक बाबींचे मार्केट कमिटीने कामे हाती घेतली आहेत.

तसेच तिसगाव उपबाजार समितीला एक नवी ओळख निर्माण करून दिली जात असल्याचे चेअरमन बर्डे म्हणाले. २०२३ मध्ये आ. राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने पारदर्शक कामकाजाचा श्रीगणेशा केला. दोन वर्षात पारदर्शक व सार्वत्रिक हिताला प्राधान्यक्रम देत आर्थिक प्रगती साधत दोन कोटी रुपयांची विकासकामे झाली. मध्यवर्ती बाजारपेठ असल्याने तिसगाव व बाजार समिती पूरक सेवा सुविधांनीयुक्त करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे सभापती सुभाषराव बर्डे यांनी सांगितले.

मुख्य कार्यालयावर सोलर यंत्रणा बसवल्याने वीज बचत होत आहे. शेतकरी निवास तसेच मिरी, करंजी उपबाजारासाठी जमीन खरेदी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. करंजी व परिसरातील शेतकऱ्यांसाठ करंजी येथे उपबाजार समिती झाल्यास शेतकऱ्यांची गैरसोय दूर होईल.

आ. राजळे, आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य सरकारच्या सहकार्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मार्केट कमिटीच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. या वेळी संचालक वैभव खलाटे, अरुण रायकर, जिजाबापू लोंढे, शेषराव कचरे, नारायण पालवे, पांडुरंग लाड, सचिव बाळासाहेब बोरुडे उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!