अहिल्यानगर- शहरातील नागरिकांना शाश्वत व नियमित पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने सुमारे १२५ कोटी रुपयांचा फेज टू पाणीपुरवठा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. २०१० मध्ये सुरू झालेल्या या योजनेत जलतंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा मिळावा, असा उद्देश होता. मात्र तब्बल १५ वर्षे उलटून गेल्यानंतरही ही योजना अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही.
आधारभूत कामे पूर्ण, मात्र मुख्य टप्पा रखडला
या योजनेत जलटाक्या उभारणे, पंप बसवणे, मोटारींची व्यवस्था, यांसारखी पायाभूत कामे पूर्ण झाली आहेत. तथापि, योजनेतील महत्त्वाचा घटक म्हणजे अंतर्गत जलवितरण व्यवस्था अजूनही अपूर्ण आहे. शहरासाठी प्रस्तावित ५६५ किलोमीटर अंतराच्या पाईपलाइनपैकी बहुतेक ठिकाणी टाकणी झाली असली, तरी अनेक भागांत जलवाहिन्यांचे जोड, चाचणी प्रक्रिया, टाक्यांचे कार्यान्वयन या बाबी थांबलेल्या आहेत.

ठेकेदार कंपन्यांनी काम बंद केल्याने अडथळा
पार्वती अॅग्रो व तापी प्रिस्टेट या दोन ठेकेदार कंपन्यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून काम पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे ही योजना थांबलेली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या कंपन्यांकडून कोणतीही स्पष्टता न दिल्याने महापालिकेने त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणही जबाबदार
या दोन्ही ठेकेदार संस्थांवर नियंत्रण ठेवणारे आणि प्रकल्प व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण देखील या रखडलेल्या योजनेस जबाबदार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्राधिकरणावरही प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
प्रशासकीय महासभेत होणार निर्णय
या संपूर्ण प्रकरणाबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासकांकडे सादर करण्यात आला असून, यावर अंतिम निर्णय प्रशासकीय महासभेत घेण्यात येणार आहे. या कारवाईनंतर संबंधित संस्थांना जबाबदारीची जाणीव होईल आणि भविष्यातील सार्वजनिक प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.