लहान मुलांच्या जीवाशी खेळ; नामांकित मॉलमधून घेतलेल्या मॅगीत निघाले मृत पालीचे पिल्लू

अहिल्यानगर : आतापर्यंत अनेकदा लहान मुलांना आवडणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या निघाल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ आता मॅगीत मृत पालीचे पिल्लू निघाल्याची घटना अहिल्यानागर मध्ये घडली आहे.

बोल्हेगाव येथील एका नागरिकाने शहरातील नामांकित मॉलमधून मॅगीचा पुडा खरेदी केला होता. त्या पुड्यात पालीचे पिल्लू निघाल्याने संबंधिताने अन्न व औषध प्रशासन विभागानेकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली.

शहरातील बोल्हेगाव येथील एका नागरिकाने २ जुलै २०२५ रोजी शहरातील नामांकित मॉलमधून किरणा खरेदी केला. त्यावेळी त्यांनी नामांकित कंपनीचे मॅगीचे दोन पुडे खरेदी केले. त्यातील एक पुड्याची मॅगी बनवून खाल्ली. तर, २८ जुलै २०२५ रोजी दुसऱ्या पुड्यातील मॅगी बनविण्यासाठी खोलली असता त्यात पालीचे पिल्लू दिसून आले. त्यानंतर त्यांनी सोमवारी सायंकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली.

तसेच मंगळवारी पुन्हा अन्न औषध विभागात येऊन कारवाईची मागणी केली. मात्र, मॅगी बनविणारी कंपनी व विक्रेता एजन्सी यांच्यावर एफएसएसआय चे नियंत्रण आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन त्यांच्यावर उचित कारवाईसाठी एफएसएसआय पत्रव्यवहार केला आहे. याबाबत काय कारवाई केली जाईल ते आगामी काळात दिसेल मात्र नागरिकांनी असे पॅकिंग पदार्थ खाण्याचे टाळलेले बरे.