अहिल्यानगर- जादा परताव्याचे आमिष दाखवून गुतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ कंपनीच्या मुख्य सूत्रधाराला येथील आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. भूपेंद्र राजाराम सावळे (वय २७, रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) असे त्याचे नाव आहे. तो नंदूरबार येथील कारागृहात होता. दरम्यान, त्याला राहाता पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करून त्याला बुधवारी राहाता येथील विशेष न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी भूपेंद्र सावळे याच्याविरोधात शिर्डी, राहाता पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. शिर्डी व राहाता येथील दाखल गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करीत आहेत.

गुंतवणूकदार शीतल गोरखनाथ पवार (वय ३३, रा. पैजनबाबाचा मळा, राहाता) यांनी ४ जुलै रोजी राहाता पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भूपेंद्र सावळे याच्यासह भाऊसाहेब आनंदराव थोरात, संदीप सावळे, सुबोध सावळे व राजाराम भटू सावळे (सर्व रा. शिर्डी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहादा पोलिसांनी भूपेंद्र सावळे याला अटक केली होती.
त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत नंदूरबार कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भूपेंद्र सावळेला न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी (दि.१५) सायंकाळी ताब्यात घेतले. त्याला बुधवारी राहाता न्यायालयासमोर हजर केले होते.
भूपेंद्र सावळे याच्या आमिषाला बळी पडून शिर्डी व राहाता परिसरातील अनेक गुंतवणुकदारांची करोडो रूपयांची गुंतवणुक ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स या कंपनीत केली असून भूपेंद्र सावळे याच्याकडून सदरची रक्कम हस्तगत करायची आहे. भूपेंद्र सावळे याने ग्रो मोअर कंपनीच्या बँक खात्यातून वेळोवेळी काही संस्थांना रक्कमा वर्ग केलेल्या आहेत. त्या रोखीने काढल्या आहेत याबाबत त्याच्याकडे तपास करायचा असल्याने दहा दिवसांची पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.