अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Published on -

अहिल्यानगर- जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार असलेल्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस सावेडी उपनगरातून जेरबंद केले. योगेश नागनाथ पोटे (वय ३०, रा. काळुबाई मंदिराजवळ, वाणीनगर, पाईपलाईन रोड, सावेडी, ता. जि. अहिल्यानगर) असे त्याचे नाव आहे.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची पडताळणी करून हद्दपार आदेशाचा भंग करणाऱ्याविरुध्द कारवाई करण्याबाबत सूचना केल्या.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बाळासाहेब नागरगोजे, रणजित जाधव, रमिझराजा आतार, भगवान थोरात, आकाश काळे, प्रशांत राठोड अशांचे पथक नेमून हद्दपार सराईत गुन्हेगारास चेक करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. २८ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील हद्दपार करण्यात सराईत गुन्हेगारांचा अहिल्यानगर शहरामध्ये शोध घेत असताना जिल्ह्यातून ६ महिन्याकरिता हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार योगेश पोटे हा विनापरवाना शहरात फिरत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलीस पथकाने सावेडी उपनगरातील वाणीनगर कमानीजवळून त्यास ताब्यात घेतले. त्याने वरीलप्रमाणे नाव सांगितले. चौकशी केली असता उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्याला जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार केल्याचे दिसून आले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल आकाश काळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!