राहुरी- येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी सहाय्य करणारा आरोपी अमोल बाळासाहेब डोंगरे याला राहुरी पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दिनांक २९ जून २०२५ रोजी सायंकाळी १ वाजता फिर्यादीच्या राहत्या घरातून फिर्यादीची अल्पवयीन मुलगी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार फिर्यादीने दिली. या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२५/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम
१३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान मुख्य आरोपी प्रविण बाळासाहेब डोंगरे (रा. मल्हारवाडी, ता. राहुरी) याने पीडित अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये त्याला मदत करणारा त्याचा सख्खा भाऊ अमोल बाळासाहेब डोंगरे (वय ३३, रा. मल्हारवाडी) यास २७ जुलै २०२५ रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम ८७, ३(५) प्रमाणे गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले आहे. अधिक तपास सुरु असून इतर आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याचे काम सुरु आहे.
राहुरी पोलीसांकडून आवाहन करण्यात आले आहे की, अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यास कोणतीही मदत करू नये, अन्यथा मदत करणाऱ्यांवरही अटकेची कारवाई केली जाईल. या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक समाधान फडोळ, हेड कॉन्स्टेबल विकास वैराळ, पोलीस नाईक गणेश सानप, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र कांबळे, कॉन्स्टेबल सागर नवले, अंबादास गीते यांच्या पथकाने ही कारवाई केली.