कर्जत- तालुक्यातील पाटेवाडी येथील वृद्ध महिलेला सोन्याच्या बिस्कीटाचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा कर्जत पोलिसांनी पर्दाफाश केला असुन, मराठवाड्यातील चार आरोपींना अटक केली आहे.
कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथील वृद्ध महिला बेबी शशिकांत महाडीक यांची १६ जुन रोजी फसवणूक झाली होती. याबाबत त्यांनी कर्जत पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले होते की, तीन चार अनोळखी व्यक्तींनी तुझ्या गळ्यातील सोन्याचे मनी, पोत व पैसे आम्हाला दे, आम्ही तुला सोन्याचे बिस्कीट देतो. यावर या वृद्ध महिलेने विश्वास ठेवत सोन्याचे दागिने व रोख रक्कम त्यांना दिली. यानंतर सोन्यासारखे दिसणारे बिस्कीट देऊन ते पसार झाले.

पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनी रमीझ मुलानी यांना या गुन्ह्याचा तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या. या पथकाने वृद्ध महिलेची सखोल चौकशी करत सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध केले. दरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपी जामखेड येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कर्जत व जामखेडच्या तपास पथकाने सापळा लावून यातील चार आरोपींना जामखेड येथे अटक केली.
अभिमान बाबु तुपे (वय ४८) विकी अभिमान तुपे (वय २७) (दोघे रा.पिठी निरगुडी, ता. पाटोदा, जि.बीड) विकास विजय जाधव (वय २८ रा. धस पिंपळगाव ता. पाटोदा जि. बीड), दत्ता अर्जुन जोरे (रा. हिवरसिंगा ता. शिरुर कासार जि. बीड) यांना अटक केली आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. यामुळे कर्जत व श्रीगोंदा तालुक्यातील अनेक गुन्हे उघडकीस येणार आहेत. अटक केलेल्या आरोपी कडून १५ ग्रॅम सोन्याचे दागिने, २५ हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली सहा लाख रुपयांची चारचाकी स्विफ्ट गाडी असा एकुण सात लाख साठ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, सपोनी रमिझ मुलानी, यांनी या घटनेचा तपास लावला. या तपास पथकात पोहेकाँ प्रवीण अंधारे, मनेष शिंदे, प्रताप देवकाते, किरण बोराडे, प्रकाश दंडाडे, किरण जाधव, नितीन धस, लहु घोलवाड, जामखेड पोलीस स्टेशनचे प्रकाश मांडगे, कुलदीप घोळवे, नितीन शिंदे, ज्योती काळे यांचा समावेश होता.