अहिल्यानगर- एमआयडीसी पोलिसांनी वांबोरी घाटातील अपघातग्रस्त मालट्रकचे टायर व अन्य साहित्य चोरीच्या गुन्ह्यात वांबोरी येथून सहा जणांना जेरबंद केले. त्यांच्याकडून तीन लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ओंकार ज्ञानदेव पवार (वय २५), शुभम जनार्धन जाधव (वय २१), मयुरेश शाम मोरे (वय २२), सचिन महादेव शेळके (वय २५), फिरोज अनिस शेख (वय ३१), दीपक सुभाष शिंदे (वय ३२ सर्व रा. वांबोरी ता. राहुरी जि. अहिल्यानगर) असे संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ३० जून २०२५ रोजी रात्री मालट्रक चेन्नई येथील जैन रिसोर्स रिसायलींग लिमीटेड या कंपनीतून माल भरुन मारुती रिसायलींग खेडा अहमदाबाद गुजरात येथे खाली करण्याकरिता जात असताना अपघात होऊन दरीत कोसळला.

या अपघातात ट्रक चालक व सिक्युरिटी गार्ड दोघे जखमी झाले. चोरांनी अपघातग्रस्त ट्रकचे सहा टायर व इतर साहित्य असा एकूण ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात मूर्ती रामस्वामी सेलप्पाकांऊडर (रा. शेकेगीरी रोड, कोंगणापूरम, ता. ऐडापाडी, जि. सेलम रा. तामिळनाडू) यांच्या फिर्यादीवरून ८ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी गुन्ह्याचा तत्काळ तपास सुरू केला.
पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना तांत्रिक विश्लेषण व बातमीदारांकडून माहिती मिळाली वरील गुन्हा वांबोरी येथील ओंकार पवार त्याच्या साथीदारांनी केला आहे. त्यानुसार मंगळवारी एमआयडीसी पोलिसांनी वांबोरी येथून वरील सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून मालट्रकचे सहा टायर व इतर साहित्य असा एकूण तीन लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक मनोज मोंढे, सहायक फौजदार मोहम्मद शेख, पोलिस अंमलदार अनिल आव्हाड, आदिनाथ पालवे, सुशांत दिवटे, विष्णू भागवत, जयसिंग शिंदे, ज्ञानेश्वर तांदळे, सुरज देशमुख यांचे पथकाने केली आहे.