चिचोंडी पाटील : नगर- जामखेड महामार्गावर रात्री ११ नंतर कोणतेही व्यवसाय सुरू न ठेवण्याबाबत पोलीस अधीक्षकांचे आदेश आहेत. मात्र, काही पोलीस कर्मचाऱ्यांकडून येथील व्यावसायिकांना त्रास देण्याच्या हेतूने बनावट कारवाई होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सध्या रंगू लागल्या आहेत.
याप्रकरणी पोलिस वाहनांची जीपीएस तपासणी केली तर अनेक बनावट कारवाया उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलीस ११ वाजण्याच्या सुमारास हॉटेल्सवर कारवाई करताना दिसून येतात. मात्र, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली तेच पोलीस कर्मचारी सदर कारवाईचा वेळ रात्री ११ नंतर असल्याचे सांगतात तर मग ११ च्या आधी कारवाई कशी होऊ शकते, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

यावरून सदर पोलीस कर्मचारी बनावट कारवाई करत तर नाहीत ना? असा सवाल उपस्थित होत आहे. रात्री अकराच्या सुमारास पोलीस कर्मचारी हॉटेलचालकांचे फोटो घेऊन सदर कारवाई रात्री बारा वाजेच्या नंतर केली असल्याचे कागदोपत्री दाखवले जात असल्याचे हॉटले व्यावसायिकांमधून बोलले जात आहे. याबाबत चोर सोडून संन्यासाला फाशी, असा काहीसा प्रकार नगर – जामखेड महामार्गावर सुरू असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
सेल्फी फोटोची आणि कार्यवाईची वेळ जुळेना?
एका पोलिस कर्मचाऱ्याने अनेक हॉटेलचालकांचे फोटो एक तास आधी घेऊन सदरची कारवाई रात्री १२ वाजेनंतर केली असल्याचे कागदोपत्री दाखवले जात असल्याचे अनेक हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज व पोलिसांच्या वाहनाचे जीआरएस तपासण्याची मागणी हॉटेल व्यावसायिक करत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कारवाईमधील फोटोंच्या वेळेची पडताळणी करून बनावट कारवाई उघडकीस आणावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.