कोपरगाव तालुक्यातील गावठी हातभट्टयांवर पोलिसांचा छापा, १ लाखांचे दारू बनवण्याचे कच्चे रसायन केले नष्ट

Published on -

कोपरगाव- येथील शहर पोलिसांनी मंगळवारी केलेल्या कारवाईमध्ये दोन वर्षांपासून फरार आरोपी मिळून आला. तसेच गावठी हातभट्टयांवर छापा टाकून हातभट्टया उद्ध्वस्त केल्या. यावेळी १ लाख १२ हजाराचे रसायन व दारुचा नाश केला. तर अजामीनपात्र वॉरंट मधील ८ आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संवत्सर शिवारात नारदा नदीच्या कडेला काटवनात गावठी हातभट्टीची दारु तयार करीत आहे. कोंबिंग मधील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी छापा टाकण्यासाठी गेले असता मंदाबाई आहेर (रा. मनाईवस्ती, शिंगणापूर) हिचेकडे हातभट्टी दारु करण्याचे १ हजार लिटर कच्चे रसायन ४० हजार रुपये व २५०० रुपयांची २५ लिटर तयार दारु मिळून आली.

तसेच दुसऱ्या ठिकाणी संवत्सर येथे गोदावरी नदीच्या कडेला काटवनात नानासाहेब गायकवाड (रा. मनाई वस्ती, संवत्सर, ता. कोपरगाव) हा गावठी हातभट्टी दारु तयार करताना आढळला. त्याच्याकडे १२०० लिटर कच्चे रसायन किंमत ४८ हजार रुपये व तयार दारु २० लिटर किंमत २००० रुपये मिळून आले.
कोपरगाव शहरात सुभाषनगर भागात रमेश रेठे हा बेकायदेशीर देशी दारुची विक्री करीत असताना आढळून आला. तसेच फरार आरोपी हरिश कुऱ्हाडे हा कोंबिंग ऑपरेशनमध्ये मिळून आला.

तसेच अजामिनपात्र वॉरंट मधील आरोपी किरण उर्फ भुऱ्या गायकवाड (रा. इंदिरानगर, कोपरगाव), तुषार दुशिंग, रोहित साळवे (दोघे, रा. टिळकनगर, कोपरगाव), बाळु खरात, विजाबाई खरात, माणिक खरात, सुभाष खरात, उमाजी रामभाऊ (सर्व रा. पानमळा, डाउच खुर्द, ता. कोपरगाव) असे कोंबिंग ऑपरेशनमध्ये मिळून आले.

ही कारवाई पोलीस अधिक्षक यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि किशोर पवार, पोसई दिपक रोठे, पोहेकॉ दिपक रोकडे, सतिष काटे, गोपीनाथ कांदळकर, एकनाथ लिंबोरे, पोकॉ श्रीकांत कुऱ्हाडे, प्रसाद साळुंखे, प्रविण रणधीर, गणेश काकडे, मपोकॉ रुपाली सातपुते यांच्या पथकाने केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!