पाथर्डी तालुक्यात गांजाची शेती करणाऱ्याला पोलिसांनी छापा टाकत पकडले, १० किलोचा गांजा केला जप्त

Published on -

पाथर्डी- तालुक्यातील माणिकदौंडी विभागातील चेकेवाडी येथे पाथर्डी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात विक्रीसाठी तयार गांजा व शेतातील गांजाची झाडे मिळून दहा किलो ७९० ग्रॅम गांजा जप्त केला. बाजारभावाप्रमाणे त्याची किमत सुमारे दोन लाख रुपये आहे. पोलिसांच्या धडक कारवाईने ग्रामीण भागात अवैधधंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांनी मावा, अवैध दारू विक्री व अंमलीपदार्थ विक्री विरुद्ध धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी तालुक्यातील अवैध व्यावयिकांविरुध्द धडक मोहीम सुरू केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी पाथर्डी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चेकेवाडी शिवारातील भीमराज दत्तू चेके यांच्या घरात तयार गांजा विक्रीसाठी असून, त्यांच्या मालकीच्या शेतातही कडवळ पिकामध्ये गांजाची झाडे आहेत.

त्यानुसार पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, शेवगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेकेवाडी येथे छापा टाकला. या पथकामध्ये पुजारी यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश भोये, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव व श्री. ढाकणे, पोलीस कर्मचारी नितीन दराडे, महेश रुईकर, बाबासाहेब बडे, सुहास गायकवाड, इजाज सय्यद, सागर बुधवंत, ज्ञानेश्वर इलग, संजय जाधव, अक्षय वडते, प्रशांत केदार व महिला कर्मचारी उत्कर्षा वडते यांनी भाग घेतला.

राजपत्रित अधिकारी म्हणून पथकामध्ये नायब तहसीलदार किशोर सानप यांचाही सहभाग होता. भीमराज चेके यांच्या घरातून तीन किलो ९५० ग्रॅम तयार गांजा अंदाजे किंमत ९४ हजार आठशे रुपये व शेतातून सहा किलो ८४० ग्रॅम वजनाची लहान मोठी गांजाची झाडे जप्त करण्यात आली. विविध कलमान्वये संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. पोलिसांनी आता शहरातील फिरते मावा विक्रेते, ग्रामीण

भागात छुप्या पद्धतीने तयार होणारा मावा, तर काही भागात मराठवाड्यातील गावांमधून आणून माव्याची होणारी विक्री, याकडे लक्ष केंद्रित केले आहे. अवैध धंद्यांबाबत कोणाला काहीही माहिती असल्यास त्यांनी थेट पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले.

आरोग्य विभागानेसुद्धा स्थानिक प्रशासनाच मावा व अमली पदार्थांमुळे तालुक्यात वेगाने फैलावणाऱ्या कर्करोगाकडे लक्ष वेधले आहे. राज्यात नगर जिल्हा व जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक कर्करोगग्रस्त असून, यामध्ये तरुणांचा मोठा भरणा आहे. मावा व अंमलीपदार्थांच्या सेवनाचे अनेकांना कर्करोग होत असल्याने स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग सर्वजण एकत्रितपणे कामाला लागले आहेत. चेकेवाडी येथील भीमराज दत्तू चेके याला पोलिसांनी अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!