अहिल्यानगर- शहरातील मंगलगेट परिसरातील कोंड्या मामा चौकात सुरू असलेल्या माव्याच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हहे शाखेच्या पोलिसांनी छापा घालून २ लाख ८४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर, एकाविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले. त्यानुसार आहेर यांनी पोलीस अंमलदार संदीप पवार, गणेश धोत्रे, शाहीद शेख, विजय ठोंबरे, रविंद्र घुंगासे यांचे पथकनेमून अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याकामी रवाना केले.

दि. १० जुलै रोजी पथक अहिल्यानगर शहरातील अवैध धंद्यांची माहिती घेत असताना पथकास गोपनीय मिळाली की, विनोद मुर्तडकर हा कोंड्या मामा चौकातील नवनाथ पान स्टॉल येथे तसेच त्याचे पाठीमागील बाजुस सुगंधीत तंबाखू व सुपारीपासून इलेक्ट्रीक मशीनवर मावा तयार करून विकत आहे.
पथकाने छापा घातला असता नवनाथ पान स्टॉलचे पाठीमागे एक व्यक्ती हा इलेक्ट्रीक मशीनवर मावा तयार करताना मिळून आला. परंतु, पोलीस पथकाची चाहुल लागताच तो मागील बाजूने पळून गेला.
पथकाने घटना ठिकाणावरून इलेक्ट्रीक मशीन व मोटार, ५ किलो सुगंधीत मावा, १० किलो सुगंधीत तंबाखु, ७० किलो कापलेली सुपारी, रत्न सुगंधीत तंबाखु, १० किलो ज्योती चुना व एक वजनकाटा असा २ लाख ८४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फरार विनोद मुर्तडकर (रा. श्रीराम चौक, पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.