अहिल्यानगरमध्ये थार गाडीतून बनावट नोटा घेऊन व्यवहार करायला निघालेल्या दोघांना पोलिसांनी सापळा रचून पकडले

Published on -

वाळकी- भारतीय चलनाच्या पाचशे रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तरुणांना नगर तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. त्यांच्याकडून बनावट नोटा, महिंद्रा कंपनीच्या थार गाडीसह सुमारे १७ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नगर-सोलापूर महामार्गावर रुईछत्तीसी गावच्या शिवारात २७ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सोमनाथ माणिक शिंदे (वय २५, रा. तपोवन रोड, नगर) व निखील शिवाजी गांगर्डे (वय २७, रा. कोंभळी, ता. कर्जत) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत.

नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना गोपनीय माहिती मिळाली की, रुईछत्तीसी परिसरात दोन इसम एका महिंद्रा थार गाडीत भारतीय चलनातील पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेवून त्या खऱ्या असल्याचे भासवून व्यवहार करण्यासाठी येत आहेत. ही माहिती मिळताच त्यांनी रात्र गस्त पथकाला बोलावून घेत पथकासोबत ते रुईछत्तीसी गावच्या शिवारात रात्री १० वाजण्याच्या सुमारास जावून सापळा लावून थांबले.

काही वेळातच संशयित थार गाडी (क्र. एम एच १६ डी एल २७९७) त्यांना येताना दिसली. पोलिसांनी ती गाडी थांबविली असता, त्यात सोमनाथ शिंदे व निखील गांगर्डे हे बसलेले दिसले. पोलिसांनी पंचांच्या समक्ष त्यांची झडती घेतली असता, सोमनाथ शिंदे याच्या खिशात पाचशे रुपयांच्या १०० बनावट नोटा आढळल्या. तर निखील गांगर्डे याच्या खिशात पाचशे रुपयांच्या ६० बनावट नोटा आढळल्या.

त्या चलनात आल्या असत्या तर त्यांचे मूल्य ८० हजार एवढे झाले असते. पोलिसांनी त्या बनावट नोटा, दोघांकडील मोबाईल, सोमनाथ शिंदे याच्या खिशातील १०, २०, ५०, १००, २०० रुपयांच्या २ हजार ८७० रुपये किंमतीच्या खऱ्या नोटा, थार गाडी, असा १७ लाख ३७हजार ८७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून दोघांना ताब्यात घेतल. या प्रकरणी पो.हे.कॉ. खंडेराव शिंदे यांच्या फिर्यादीवरून सोमनाथ शिंदे व निखील गांगर्डे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!