अहिल्यानगर- नेवासा तालुक्यात रस्ता लूट करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने नेवासा फाटा येथे सापळा लावून पकडली. दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून मोटारीसह सहा लाख ५०० मुद्देमाल जप्त केला. गौरव शहादेव शिरसाठ (वय २५), महेश आबासाहेब शिरसाठ (वय २६, दोघे रा. म्हसले, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी धर्मनाथ टिकाराम जोहरे (वय ४३, रा. गारखेडा परिसर, ता. जि. छत्रपती संभाजीनगर) हे दि. १७ रोजी रात्री नेवासा फाटा छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी वाहनांची वाट पाहत असताना त्यांना एका स्विफ्ट कार चालकाने छत्रपती संभाजीनगर येथे सोडतो, असे सांगून कारमध्ये बसवले. कारमध्ये बसल्यानंतर फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून व मारहाण करून रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल फोन, घड्याळ काढून घेऊन कारमधून उतरवून दिले. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.

गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गुन्ह्याचा तपास करून उघडकीस आणण्याबाबत आदेशीत केले. त्यानुसार कबाडी यांनी उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, संदीप दरंदले, प्रमोद जाधव, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, उमाकांत गावडे, महादेव भांड यांचे पथक तयार करून आरोपींच्या शोधाकामी रवाना केले.
पथकाने घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून माहिती संकलित केली. तांत्रिक विश्लेषणाचे आधारे वरील गुन्हा महेश शिरसाठ व त्याच्या साथीदाराने केला असून, ते दोघे मोटारीने भेंडा येथून नेवासा फाटा येथे येत असल्याची समजले. त्यानुसार पोलीस पथकाने नागापूर फाटा कमानीजवळ सापळा रचला.
संशयित कार येताच पोलिसांनी कार अडविली. कारमधील दोघांना ताब्यात घेतले . असता त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली. जबरी चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेला लॅपटॉप, मोबाईल फोन, रोख रक्कम, मोटारकार, चाकू असा सहा लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.