राहुरीत पैसे चोरणाऱ्या सराईत टोळींचा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे लावला शोध, सापळा रचत आरोपींच्या आवळल्या मुसक्या

राहुरीत मोटारसायकलच्या डिक्कीतून पैसे चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी छडा लावला. छत्रपती संभाजीनगर येथून तिघांना अटक करून ६० हजारांची रोकड जप्त केली असून पुढील तपासात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Published on -

Ahilyanagar News: राहुरी- बँक किंवा पतसंस्थांसमोर उभ्या असलेल्या ग्राहकांच्या मोटारसायकलच्या डिक्कीतून पैसे चोरणाऱ्या आंतरराज्य सराईत टोळीचा छडा लावत राहुरी पोलिसांनी तीन चोरट्यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे. अटकेदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ६० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून, या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दि. २८ मे २०२५ रोजी राहुरी येथील स्टेट बँक शाखेसमोर सोमनाथ लक्ष्मण ढसाळ (रा. वाघाचा आखाडा, ता. राहुरी) यांनी आपल्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेली १ लाख रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीने चोरी केली. याबाबत राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ६१०/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून माहिती गोळा केली. तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन आंध्र प्रदेशातील पितला देवाधनम नागय्याह (वय ३५), अवुला आमोसे थिप्पाइह (वय ३७), कुणचाला चिन्ना रवी (वय ३७) या तिघा आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

आरोपींना पाच दिवसाची पोलिस कोठडी

दि.५ जून २०२५ रोजी आरोपींना अटक करण्यात आली व त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रिमांड कालावधीत त्यांच्या ताब्यातून ६० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. राहुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत असून, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात झाली. यामध्ये सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते, हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे, विजय नवले, कॉन्स्टेबल जयदीप बडे आणि योगेश आव्हाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News