अहिल्यानगर- स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपनिरीक्षक व तीन अंमलदारांनी ग्रो मोअर कंपनीच्या गुन्ह्यातील आरोपीकडे जानेवारी २०२५ मध्ये गुन्हा न दाखल करण्यासाठी दीड कोटी रुपये घेतल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. त्यानुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपनिरीक्षकासह चौघांना तत्काळ सेवेतून निलंबित केले.
पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार मनोज गोसावी, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे (सर्व नेमणूक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर), असे निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

शिर्डी ग्रो मोअर इन्व्हेसमेन्ट फायन्सास कंपनीच्या संचालक मंडळाने विश्वास संपादन करून आठ लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. या गुन्ह्यात आरोपी भूपेंद्र सावळे (रा. नांदुर्खी रोड, शिर्डी, ता. राहाता) ड याला अटक केली. चौकशीत शेअर मार्केटच्या चढ उतारामध्ये मोठ्या प्रमाणात घाटा झाल्यामुळे गुंतवणुकदारांचे पैसे परत करू शकलो नाही.
न त्याच्याकडील ठेवीबाबत विचारले असता त्याने सांगितले की, १५ जानेवारी २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक धाकराव व तीन पोलीस कर्मचारी यांनी मोटारीने मी नाशिकडे जात असताना लोणीजवळ मित्र व दोन भावांना अडविले. तुझ्याकडे आरबीआयचा परवाना नसताना जनतेकडून पैसे गोळा करून त्यांची न फसवणूक करतो, म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करतो, असे म्हणाले. विनाकारण गुन्ह्यात अडकवू नका, अशी विनंती केली. त्यावर त्यांच्या सोबतचे कर्मचारी म्हणाले, तुला जर यातून सुटायचे असेल – तर आम्हाला रोख १ कोटी ५० लाख रुपये दे. त्यावर मी म्हणालो, माझ्याकडे रोख पैसे नाहीत.
त्यांनतर धाकराव व पोलिस कर्मचारी आम्हा सर्वांना अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील पार्किंगमध्ये घेऊन आले. तेथे उपनिरीक्षक धाकराव यांनी मला ऑनलाईन दीड कोटींची मागणी केली. त्यावर विनाकारण एखाद्या खोट्या गुन्ह्यात अडकण्यापेक्षा उपनिरीक्षक धाकराव यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या खात्यावर ऑनलाईन १ कोटी ५० लाख रुपये ट्रान्सफर केले, अशी आरोपीने माहिती दिली. त्याबाबत तपासादरम्यान चौकशी केली असता उपनिरीक्षक धाकराव व पोलीस अंमलदाराने गैरकृत्य केल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे.
त्यानुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी त्यांना सेवेतून निलंबित केले. याप्रकरणी प्राथमिक चौकशी सुरु करण्यात आली असून, चौकशी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी नेमणूक करण्यात आली आहे.