शेवगाव- तालुका व शहरातील कुरेशी समाज व व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत जनावरांची खरेदी-विक्रीचा व्यवसाय बेमुदत बंद करण्याचा मोठा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. यासंदर्भात समाजातर्फे शेवगावचे तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले असून, भविष्यात कुरेशी समाजाच्यावतीने राज्य पातळीवरही आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
या बैठकीत कुरेशी समाजातील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येत, सध्याच्या परिस्थितीत कायदेशीर परवानगी घेऊनही जनावरांची वाहतूक करताना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला. काही तथाकथित गोरक्षक संघटनांकडून विनाकारण अडवणूक केली जाते, पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देऊन कोणताही पुरावा नसताना गुन्हे दाखल केले जातात.

कायदेशीर जनावरे नेणाऱ्यांनाही त्रास देऊन आर्थिक व मानसिक छळ होतो, अशी व्यथा समाजातील प्रतिनिधींनी व्यक्त केली. व्यवसायावर थेट परिणाम होत असल्यामुळे हा खरेदी-विक्रीचा व्यवहार संपूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. जनावरे खरेदी-विक्री ही शेतकरी आणि खाटीक यांच्यातील पारंपरिक साखळी आहे. भाकड व न उपयोगी जनावरे खरेदी करून त्यांचे कायदेशीर प्रक्रियेनुसार व्यवस्थापन केले जाते. मात्र, सध्या खरेदीदारांना अडवून, मारहाण करून पैसे उकळले जातात, यामुळे व्यवसाय करणं अशक्य होत चाललं आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला.
कुरेशी समाजातील प्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले की, आम्ही कोणतेही बेकायदेशीर कृत्य करत नाही. मात्र, आमच्यावर सातत्याने अन्याय होतो आहे. म्हणूनच आम्ही बेमुदत जनावरे खरेदी-विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच संपूर्ण जिल्ह्यातील समाजबांधव शासनाकडे याबाबत निवेदन सादर करतील. या निर्णयामुळे शेवगाव तालुक्यातील जनावर खरेदी-विक्री व्यवसायावर मोठा परिणाम होणार असून, शेतकऱ्यांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
समाजातर्फे न्याय मिळेपर्यंत हा निर्णय कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जाकीर कुरेशी, शकील सौदागर, मुस्तक कुरेशी, अशपाक कुरेशी, साजिद कुरेशी, फयाज सौदागर, ख्वाजा चौधरी, शरीफ सौदागर, फिरोज कुरेशी, वहिद कुरेशी, यासह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.