राहुरी- शासकीय अनुदानातून सोलर पंप मिळवून देण्याचे आमीष दाखवणारा भामटा राहुरी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. सदर आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले.
या प्रकारानंतर जिल्हाभरात ज्या शेतकऱ्यांची सोलार पंपच्या नावाने फसवणूक झाली, त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की शेतकऱ्यांना शासकीय अनुदानातून सोलर पंप मिळवून देतो असे खोटे सांगून राहुरी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना फसवले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या रक्कमा घेऊनही त्यांना सोलर पंप दिले नाहीत. याबाबत आलेल्या तक्रारीवरून संदीप दिलीप बोडखे, रा. टाकळीभान,
ता. श्रीरामपूर याच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास राहुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपीवर शेवगाव, नेवासा पोलीस स्टेशन तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी फसवणुकीचे अशाच प्रकार गुन्हे दाखल आहेत. तरी ज्या शेतकऱ्यांची अशाप्रकारे फसवणूक झाली आहे त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सदरची कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तसेच पो.नि. संजय आर. ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पो.उप.नि. राजू जाधव, पोहेकॉ. हनुमंत आव्हाड, पोकॉ. गणेश लिपने यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पो. उप. नि. राजू जाधव करत आहेत.