श्रीगोंदा- तालुक्यातील गव्हाणवाडी परिसरात साठवणूक करून ठेवलेल्या अवैध गुटख्यावर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने कारवाई करत ६६ हजार ६९४ रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेतला. कारवाई होणार असल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित असलेल्या दोघांनी तेथून धूम ठोकली.
सोमवारी दि.७ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कारवाई करत करण भरत काळे (रा. सोनलकरवस्ती गव्हाणेवाडी), अनिकेत सोनवणे (पुर्ण नाव माहित नाही. रा. ढवळगाव ता. श्रीगोंदा) यांच्या विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबत पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादी नुसार विशेष पोलीस पथकाचे पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणवाडी परिसरातील सोनलकर वस्तीवरील एका घराचे आडोशाला अवैध गुटख्याची साठवणूक केल्याची माहिती मिळाली.
त्या नुसार खाडे यांच्या पथकाने सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी छापा मारला. पोलिसांना पाहताच तेथील दोघेजण तेथून पळुन गेले. पोलिसांनी तेथे अधिक तपास करत ६६ हजार ६९४ रुपये किमतीचा गुटखा ताब्यात घेतला. प्रकरणी अधिक तपास बेलवंडी पोलिस करत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेतून दुर्लक्षित असलेल्या आणि अवैध व्यवसायात पोलिस ठाण्याची हद्द कायमच अलबेल असल्याची बतावणी करणाऱ्या बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गव्हाणवाडी परिसरात पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या पथकाने विक्रीसाठी साठवणूक केलेल्या अवैध गुटख्यावर जोरदार कारवाई करत बेलवंडी पोलिस ठाण्याचा कारभार चव्हाट्यावर आणला. या सोबत इतर अवैध व्यवसायावर देखील कारवाई करावी अशी मागणी होत आहे.