रेल्वे विभागाच्या तटबंदीमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हस्तक्षेप करण्याती मा.आ. स्नेहलता कोल्हेंची मागणी

Published on -

कोपरगाव- रेल्वे मार्गालगत असलेल्या राज्य मार्ग, जिल्हा मार्ग, इरिगेशनचे रस्ते, ग्रामपंचायतीचे व शिवरस्ते या सर्वांवर रेल्वे विभागाकडून अलीकडे हद्द निश्चिती करत तटबंदीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन वापरात असलेले अनेक रस्ते अचानकपणे बंद झाल्याने मोठा वाहतूक आणि सार्वजनिक हिताचा प्रश्न निर्माण झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.

या तटबंदीमुळे महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाच्या निधीतून उभारलेले अनेक महत्वाचे रस्ते नागरिकांसाठी आता अनुपलब्ध झाले आहेत. हे रस्ते पूर्वीपासून नागरिकांच्या नियमित वाहतुकीसाठी वापरले जात होते. मात्र, सध्या रेल्वे खात्याच्या या कारवाईमुळे ग्रामीण भागात अंतर्गत वाद निर्माण होत असून नागरिकांना पर्यायी मार्गही उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, कामगार, तसेच महिला आणि वृद्ध नागरिक यांच्यावर या तटबंदीचा गंभीर परिणाम होत आहे.

या पार्श्वभूमीवर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून सदर बाब लक्षात आणून दिली आहे. रेल्वे विभागाची सुरक्षितता ही महत्वाची असली तरी नागरिकांच्या हितासाठी त्वरित पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे. या समस्येवर तातडीने निर्णय घेऊन ज्या रस्त्यांवर तटबंदीमुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी अंडरपास, ओव्हरब्रिज किंवा पर्यायी रस्त्यांची आखणी करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी आ. कोल्हे यांनी केली आहे.

मुख्य रस्त्यांना जोडणारे अंतर्गत अनेक रस्ते या तटबंदीमुळे बंद होत असल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांची अडचण निर्माण झाली असून पर्यायी रस्त्यांची सोय करण्याची गरज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!