अहिल्यानगर : जिल्ह्यात आतापर्यंत ९३.४१ टक्क्यांवर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. विविध पिकांच्या ६ लाख ६९ हजार ११ हेक्टरवर खरीप पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक १ लाख ७४ हजार २३३ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी झाली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात १२३.९ मिमी पावसाची नोंद झाली. मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी जुलैपर्यंत ३३१.७ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यावर्षी २०७.८ मिमी पाऊस कमी झाला. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत २०४ टक्क्यांनी पावसाची तूट आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप पिकांचे सरासरी ७ लाख १६ हजार २०८ हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये आतापर्यंत ६ लाख ६९ हजार ११ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात १०१५५ हेक्टरवर भात पिकाची लावणी झाली.५८ हजार १७३ हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली. मका पिकाची ९९ हजार २६६ हेक्टरवर पेरणी झाली.
तुरीची ६६ हजार ८५८ हेक्टरवर पेरणी झाली. मुगाची ४७ हजार ९३९ हेक्टरवर पेरणी झाली. उडीद ६६ हजार ८१७ हेक्टर, भुईमूग ४५३४ हेक्टर, सूर्यफूल ४३ हेक्टरवर पेरणी झाली. सोयाबीनची सर्वाधिक १ लाख ७४ हजार २३३ हेक्टरवर पेरणी झाली. कपाशीची १ लाख ३५ हजार ७८२ हेक्टरवर लागवड झाली.
जिल्ह्यात २४ जुलैअखेर १२३.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जून आणि जुलै महिन्यात फक्त १४ दिवस पाऊस झाला. जूनमध्ये ८०.१ मिमी, तर जुलैमध्ये ४३.८ मिमी पाऊस झाला. मागील वर्षी २०२४ मध्ये जूनमध्ये १७७.३ मिमी, तर जुलैमध्ये १५४.४ मिमी असा ३३१.७ मिमी पाऊस झाला. दोन महिन्यात पावसाचे दिवस ३४ होते. गतवर्षीच्या तुलनेत २०७.८ मिमी पावसाची तूट झाली.